मुंबई : शिवसेनेसाठी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या नामांतरांना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली़ नवी मुंबई विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून, या निर्णयांद्वारे शिवसेनेने हिंदुत्ववादी आणि आगरी-कोळी समाजातील मतपेढी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेतील बंडाळीमुळे अस्थिर राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले नामांतराचे निर्णय घेत ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाशी आणि शिवसेनेच्या पाठिराख्या आगरी-कोळी समाजाच्या भावनांशी बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने यापूर्वीच केला. मात्र, केंद्र सरकारने त्यास अजूनही मंजुरी दिलेली नाही. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला हिंदुत्ववादी प्रतिमेसाठी नामांतराचा विषय महत्त्वाचा होता. या पार्श्वभूमीवर नगरविकास   विभागाकडून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला आणि तो मंजूरही झाला.

आता हा प्रस्ताव नियमाप्रमाणे पुढील प्रशासकीय कार्यवाहीसाठी केंद्र सरकारला पाठविण्यात येईल. त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून करण्यात येईल.

नवी मुंबईतील नियोजित विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हे विमानतळ जाहीर झाल्यानंतर त्यास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली होती. मात्र, या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२० मध्ये सिडकोमार्फत केला. त्यामुळे स्थानिक आगरी-कोळी समजात असंतोष निर्माण झाला. ठाणे, रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी आगरी-कोळी समाजाचे मोर्चे निघाले आणि दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी झाली. मुंबई महानगर प्रदेशात आगरी-कोळी समाज हा शिवसेनेचा पाठिराखा आहे व मोठी मतपेढी आहे. नामकरण वादातून ती शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘‘लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी तसेच त्यांच्या मागण्यांसाठी दि.बा. पाटील यांचे योगदान व विविध संघटनांची मागणी विचारात घेता या विमानतळाचे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांचे पुनर्गठन

मुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांचे पुन्हा पुनर्गठन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या मंडळाची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपुष्टात आली होती आणि दोन वर्षांनंतर या मंडळांना मुदतवाढ देण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्यात आली आहे.

मराठा समाजातील तरुणांना सरकारी सेवेसाठी दिलासा

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे निवड होऊनही नोकरीपासून वंचित राहिलेल्या सुमारे साडेतीन हजार मराठा समाजाच्या उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी विधिमंडळात विधेयक मांडण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्द केले होते. मात्र हे आरक्षण लागू होते त्यावेळी राज्यात विविध विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात ‘एसईबीसी’ प्रवर्गातून सुमारे साडेतीन हजार उमेदवारांची विविध संवर्गात निवड झाली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhajinagar aurangabad dharashiv osmanabad nomination decision state cabinet ysh
First published on: 30-06-2022 at 01:17 IST