मुंबई : पती-पत्नीमधील भेटवस्तूंच्या कर आकारणीवर प्राप्तिकर कायद्याद्वारे दिल्या जाणाऱ्या सवलतीशी संबंधित तरतुदींना एका समलिंगी जोडप्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५६ (२) (१०) ची पाचवी तरतूद समलिंगी दाम्पत्याला सापत्न वागणूक देणारी आहे. त्यामुळे, या तरतुदीतील पती-पत्नी हा शब्द असंवैधानिक घोषित करावा, अशी मागणी याचिकाकर्त्या समलिंगी जोडप्याने केली आहे. संबंधित तरतुदीमध्ये समलिंगी जोडप्याला पती-पत्नी या शब्दाच्या व्याप्ती आणि व्याख्येतून वगळण्यात आले आहे.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम ५६ (२) (१०) अंतर्गत, पुरेशा मोबदल्याशिवाय मिळालेली ५० हजार रुपयांहून अधिकच्या मूल्याची रक्कम, मालमत्ता यावर ‘इतर स्रोतांतून मिळणारे उत्पन्न’ म्हणून कर आकारला जातो. तथापि, या कलमाच्या पाचव्या तरतुदीनुसार नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूंना कर आकारणीतून सूट देण्यात आली आहे. नातेवाईकांकडून या शब्दाच्या व्याख्येत पती-पत्नी यांचाही समावेश आहे. तथापि, कायद्यात ‘पती-पत्नी’ हा शब्द स्वतंत्रपणे परिभाषित केलेला नाही, असे याचिकाकर्त्या जोडप्याने याचिकेत म्हटले आहे.
न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठापुढे याचिकाकर्त्या जोडप्याच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी, कायद्यातील तरतुदीच्या घटनात्मक वैधतेला याचिकेत आव्हान देण्यात आल्याचे नमूद करून खंडपीठाने देशाच्या ॲटर्नी जनरलना नोटीस बजावली. तसेच, या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी १८ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.
दरम्यान, बऱ्याच काळापासून नातेसंबंधात असलेले समलिंगी जोडपेही भिन्नलिंगी दाम्पत्याप्रमाणेत असतात. आम्हीही बऱ्याच काळापासून स्थिर नातेसंबंधात आहोत. त्यामुळे, प्राप्तिकर कायद्याच्या कायद्याच्या कलम ५६ (२) (१०) च्या पाचव्या तरतुदीचा आम्हालाही लाभ देण्यात यावा. तसेच, या तरतुदीतील पती-पत्नी या शब्दाच्या व्याख्येत समलिंगी जोडप्यांनाही समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्या जोडप्याने केली आहे.