‘ईडी’चा दावा; न्यायालयीन कोठडीत ७ मार्चपर्यत वाढ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ हे तपासात कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत. शिवाय व्यवहाराचे तपशील सादर केले जात नसल्याने तपासावर परिणाम होत असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सोमवारी विशेष न्यायालयाकडे करण्यात आला. यामुळे समीर यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी न्यायालयाने मान्य केल्याने समीर यांचा कारागृहातील मुक्काम ७ मार्चपर्यंत वाढला आहे.

समीर यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्या वेळेस तपासात सहकार्य करत नसल्याच्या कारणास्तव त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी ‘ईडी’तर्फे करण्यात आली. ही मागणी करताना समीर यांच्याकडून कशा अडचणी येत आहेत हेही ‘ईडी’च्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. समीर यांनी तपासात हरप्रकारे सहकार्य करण्याचे तसेच विविध कंपन्यांकडून आलेल्या निधीच्या तपशीलाची कागदपत्रे सादर करण्याचे आश्वासन दिले होते.

प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून घोटाळ्याच्या तपासाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत, असा दावा ‘ईडी’तर्फे करण्यात आला. यात बलवा समूह, डीबी रियाल्टी, संजय काकडे ग्रुप, युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि अन्य कंपन्यांकडून आलेल्या निधीच्या तपशीलाच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

याशिवाय वांद्रे, सांताक्रुझ आणि खारघर येथील प्रकल्पांमध्ये गुंतवण्यात आलेला निधी नेमका कुठून आला याचाही तपशील समीर यांच्याकडून देण्यात येणार होता.

परदेशी गुंतवणुकीची कबुली

समीर यांनी परदेशी गुंतवणूक केल्याचे मान्य केले असले तरी त्याचा तपशील, बँक खात्यांची माहिती, करार यांची कागदपत्रे त्यांनी सादर केलेली नाहीत, असा दावाही ‘ईडी’ने केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer bhujbal in trouble