मुंबई : आर्यन खान अमली पदार्थप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘एनसीबी’चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांची शनिवारी पाच तास चौकशी केली. चौकशीदरम्यान संपूर्ण माहिती न मिळाल्याने वानखेडे यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.
समीर वानखेडे यांच्याकडे ‘एनसीबी’च्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा घातला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आले होते. त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाप्रकरणी ‘एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासही केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयने शनिवारी त्यांची चौकशी केली.