मुंबई: दुष्काळ, अतिवृष्टी, परतीच्या पावसाचे कसलेही संकट येवो, सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना लवकरच भरपाई दिली जाईल. तसेच येणाऱ्या काळात बळीराजाच्या समृद्धीसाठी कृषी विकास आराखडा तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली.
मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षां’ निवासस्थानी राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांसमवेत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. या वेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार श्रीकांत शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. राज्यात सरकार बदलल्यापासून वातावरण बदलत असून लोक मोठय़ा उत्साहात सर्व सण साजरे करीत आहेत. हे बळीराजाचे सरकार असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नियम बाजूला ठेवत अनेक चांगले निर्णय सरकारने घेतल्याचे सांगून शिंदे म्हणाले, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा दुपटीने मदत देण्यात आली असून शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनाही मदत वाटप सुरू केले आहे. आपणही शेतकरी कटुंबातील असून संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे सरकारचे कर्तव्यच आहे. आमच्यावरही संकट आले होते. मात्र आम्ही खचून गेलो नाही तर जिंकलोही. तुम्हीसुद्धा खचून न जाता संकटाचा मुकाबला करा, सरकार मदतीसाठी तयार आहे असेही शिंदे यांनी या वेळी सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने गेल्या तीन महिन्यांत अनेक निर्णय घेतले आहेत. बळीराजाला समृद्ध करण्यासाठी कृषी विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्यातून आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायांची जोड देण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे शेतकऱ्यांना वळविण्यावर भर देण्यात येणार आहे. सत्तेवर असताना विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. मात्र आता टीका करीत असून त्यांना उत्तर द्यायचे नाही. मात्र शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करावेत सरकार त्यांना सर्व मदत करील. तसेच कोणत्याही संकटाचा धीरोदत्तपणे मुकाबला करा असे आवाहनही शिंदे यांनी या वेळी केले.