मुंबई : शालेय शिक्षण विभागाने तिसरी भाषा लागू करताना इयत्ता पहिलीसाठीच्या तासिकांचे नवे वेळापत्रक जाहीर केले. मात्र हे करताना तिसऱ्या भाषेसाठी कला, शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षण यांसारख्या विषयांच्या तासिका कालावधीत १० ते २५ मिनिटांची कपात केली. त्यामुळे तिसऱ्या भाषेच्या अट्टहासापायी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विषयांच्या तासिकांच्या कालावधीलाच कात्री लावली.

शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा विरोध डावलून शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून ‘त्रिभाषा सूत्र’ स्वीकारून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी भाषा लागू केली. शाळा १६ जूनपासून सुरू झाल्या असून, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

परिषदेकडून (एससीईआरटी) इयत्ता पहिलीच्या तासिकांचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले.कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षण या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यास मदत होऊन त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासालाही चालना मिळते. मात्र तिसऱ्या भाषेसाठी या आनंददायी अभ्यासक्रमांच्या तासिका कालावधीलाच कात्री लावल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

असे आहेत नवीन बदल

जुन्या वेळापत्रकानुसार एका आठवड्यामध्ये कला शिक्षणासाठी ६० मिनिटांच्या चार तासिका होत्या. तसेच शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षणासाठी आठवड्यातून प्रत्येकी दोन तासिका ४५ मिनिटांच्या होत्या. ‘एससीईआरटी’ने नव्या वेळापत्रकात या अभ्यासक्रमांच्या तासिकांमध्ये कोणतेही बदल केले नसले तरी कला शिक्षणाचा कालावधी ६० मिनिटांवरून ३५ मिनिटे केला आहे, तसेच शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षणाचा कालावधी ४५ मिनिटांवरून ३५ मिनिटे केला आहे.

विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळावा यासाठी कला-क्रीडा यांचा भरपूर समावेश असलेला ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी वार्षिक वेळापत्रकात संमेलने, शैक्षणिक सहली आदींचे नियोजन करण्यात येईल. त्यामुळे शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायीच ठरणार आहे.- दादाजी भुसे, शालेय शिक्षणमंत्री