सप्ताहअखेर दोन महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर
अमेरिकी फेडरल रिझव्र्हने स्थिर व्याजदराच्या जाहीर केलेल्या पतधोरणाचे येथील भांडवली बाजारात सकारात्मक पडसाद उमटले. एकाच व्यवहारात तब्बल २७५.३७ अंश झेप नोंदवीत सेन्सेक्स दिवसअखेर २४,९८६.९४ वर पोहोचला. दोन महिन्यांच्या उच्चांकावर नेऊन ठेवणाऱ्या प्रमुख निर्देशांकाची ही सलग तिसरी सप्ताह वाढ ठरली. तर निफ्टीत ९१.८० अंश भर पडून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ७,६०४.३५ वर पोहोचला.
अमेरिकी फेडरल रिझव्र्हने बुधवारी स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर केले. त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागतच झाले. भारतातही हेच चित्र कायम दिसून प्रमुख निर्देशांकांनी आठवडय़ातील शेवटच्या व्यवहारात उसळी घेतली. यामुळे सेन्सेक्सला २५ हजारानजीक पोहोचता आले, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही त्याचा ७,६००चा टप्पा सर केला.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी व्यवहाराच्या सुरुवातीलाच २४,९८६.९४ या वरच्या टप्प्यावर होता. दिवसअखेर त्याने २५ हजारानजीक विराम घेताना त्याच्या ६ जानेवारीनंतरच्या टप्प्यावर स्थिरावणे पसंत केले.
डॉलरच्या तुलनेतील परकी चलन विनिमय व्यवहारातील रुपयाचे गेल्या दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलेले मूल्यही बाजारातील तेजीच्या पथ्यावर पडले. मुंबईच्या शेअर बाजारात आरोग्यनिगा क्षेत्रीय निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक वाढले.
सेन्सेक्समध्ये टीसीएस, गेल, अदानी पोर्ट्स, भेल, इन्फोसिस, महिंद्र अॅन्ड महिंद्र, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, विप्रो आदी तेजीत राहिले. निर्देशांकातील प्रमुख ३० पैकी केवळ चार समभागांचेच मूल्य घसरले.
माहिती तंत्रज्ञान निर्देशांक सर्वाधिक २.३१ टक्क्य़ांनी वाढला. तर मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक ०.६६ टक्क्य़ांपर्यंत वाढले. सरकारचे र्निबध आणि त्यावर उच्च न्यायालयाचा दिलासा यानंतरही औषधनिर्मिती कंपन्यांचे समभाग सप्ताहअखेर सावरू शकले नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 19th Mar 2016 रोजी प्रकाशित
सेन्सेक्स २५ हजारानजीक
सप्ताहअखेर दोन महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 19-03-2016 at 02:55 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty