राणे यांचा आरोप; विरोध करणाऱ्याला ‘मातोश्री’वर दमबाजी

कोकणातील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात जाहीर केले होते. पण अनंत गिते आणि विनायक राऊत या शिवसेनेच्या दोन नेत्यांनीच हा प्रकल्प कोकणात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या संघर्ष समितीच्या अध्यक्षाला ‘मातोश्री’वर बोलावून दमबाजी करण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. केंद्रात भाजपचे सरकार असले तरी कोकणाचा भस्मासूर करणारा हा प्रकल्प उभारण्यास आपला विरोध असून, प्रसंगी फटके देऊ पण प्रकल्प उभारू देणार नाही, असा इशाराही राणे यांनी दिला.

कोकणातील राजापूर आणि देवगड अशा दोन तालुक्यांमध्ये नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीने उभारण्यात येणार आहे. राजापूर तालुक्यातील १६ गावे तर देवगड तालुक्यातील रामेश्वर आणि गिर्ये अशा १८ गावांमधील 1६ हजार क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्याची योजना आहे. सुमारे चार हजार कुटुंबे त्यातून विस्थापित होणार आहेत. तसेच समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मच्छिमारीवर परिणाम होऊ शकतो. या परिसरात आब्यांची सात लाख झाडे असल्याची माहितीही त्यांनी दिली. कोकणात कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशाराच राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते आणि स्थानिक खासदार विनायक राऊत यांनीच आंध्र प्रदेशात उभारण्यात येणारा हा प्रकल्प कोकणात आणण्याकरिता आग्रह धरला होता, असा आरोपही राणे यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तसेच वक्तव्य केले होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एकीकडे प्रकल्पाला विरोध करायचा आणि दुसरीकडे प्रकल्पाला मदत करायची अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. प्रकल्पाला विरोध करणारे संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांना ‘मातोश्री’वर दमबाजी करण्यात आली. प्रकल्पाच्या विरोधात आवाज करू नका, असे त्यांना बजाविण्यात आले होते, असे राणे यांनी सांगितले. या वेळी वालम यांच्या पुत्राने २८ नोव्हेंबरला वडिलांना ‘मातोश्री’वर आलेला अनुभव कथन केला.