शिवसेना नेते संजय राऊत यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सत्तास्थापनेसाठी राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेनेची खिंड लढवणारे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डिस्चार्ज मिळाल्यानतंर बोलताना, तब्बेतीची काळजी न घेतल्याने उद्धव ठाकरे आपल्यावर रागावले होते असा खुलासा केला. तब्बेतीची काळजी घेण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असा विश्वास व्यक्त केला. “अडीच- अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पुढच्या गोष्टी असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांना अतिदक्षता विभागात ठेवून आवश्यक चाचण्या आणि अँन्जिओग्राफी करण्यात आली. त्यात दोन ब्लॉकेजेस आढळळ्याने डॉ मॅथ्यू यांनी त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टी केली. दोन दिवस विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

आणखी वाचा- संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

शिवसेना नेते संजय राऊत हे निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून शिवसेनेची बाजू मांडत आहेत. सातत्याने त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असंच म्हटलं आहे. संजय राऊत लीलावती रुग्णालयात होते तेव्हा त्यांची भेट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांनी घेतली होती. तसंच काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती.