मुंबई : पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी वाढली आहे. बिबट्यांची संख्या सुमारे १३०० झाली आहे. या संदर्भात केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहे. वाढलेल्या बिबट्यांचे देशातील अन्य ठिकाणी स्थलांतर करण्याची, बिबट्याची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नसबंदी करण्याची आणि नरभक्ष्यक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या वेळी माजी मंत्री दिलीप वळसे – पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील, वन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरुर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत, यासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना राबविण्यात येतील. वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारासह इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे, अशा ठिकाणी करण्यात येईल. बाधित क्षेत्रातील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने २०० पिंजरे खरेदी करण्यात येतील. त्या शिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी एक हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी दहा कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वन विभागाला लागणारी वाहने, पिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू न देण्याच्या सूचनाही नाईक यांनी दिल्या.