मुंबई : मराठवाड्यात आलेल्या पूरस्थितीमुळे तेथील शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांना विविध स्वरुपातील मदत करण्यात येत आहे. समाजसेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची परंपरा जपणाऱ्या एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थिनींनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भगिनींसाठी ‘साडी भेट : पूरग्रस्त भगिनींसाठी वस्त्रदान उपक्रम’ हा सामाजिक उपक्रम हाती घेतला. या उपक्रमांतर्गत त्यांनी पूरग्रस्त महिलांना वस्त्र तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

राज्यात मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. पिके नष्ट होण्याबराेबरच त्यांचे संसारही उद्ध्वस्त झाले. त्यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थिनींनी मराठवाड्यातील पूरग्रस्त भगिनींसाठी ‘साडी भेट : पूरग्रस्त भगिनींसाठी वस्त्रदान उपक्रम’ हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठाने २०६ नवीन साड्या, १२० टॉवेल्स, १६० किलो तांदूळ व डाळ असे साहित्य जमा केले. हे साहित्य विद्यापीठातर्फे ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि भूम तालुक्यातील पूरग्रस्त महिलांना वितरित करण्यात येणार आहे. या संस्थेने पूरग्रस्त भागांतील महिलांच्या पुनर्वसनासाठी सक्रियपणे कार्य हाती घेतले आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये ६८ विद्यार्थी, शिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी सहभागी झाले होते.

विद्यापीठातील विद्यार्थिनीनी जमा केलेली मदत विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्ज्वला चक्रदेव यांच्या हस्ते सेवा सहयोग फाउंडेशनच्या कार्यकारी समिती सदस्य डॉ. अस्मिता हेगडे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांचे संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.