भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवडणुकीत एकमेकांशी दोन हात करणारे कट्टर प्रतिस्पर्धी एन.श्रीनिवासन आणि शरद पवार यांनी हातमिळवणी करण्याचे ठरविले आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि श्रीनिवासन यांच्यात चर्चा झाली होती. मात्र, या चर्चेदरम्यान दालमियांनी श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या काही समित्यांबद्दल माहिती देण्यास नकार दिला. याशिवाय, दालमिया बीसीसीआयचे अध्यक्ष असले तरी प्रत्यक्षात संघटनेचा सारा कारभार त्यांचा मुलाकडून चालविण्यात येत आहे. त्यामुळे श्रीनिवासन दालमियांवर नाराज आहेत. म्हणूनच एन. श्रीनिवासन आणि शरद पवार यांनी जुने वाद विसरून एकत्र येण्याचे ठरविले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्वचषक स्पर्धेदरम्यान, ऑस्ट्रेलियात असताना श्रीनिवासन यांनी दुरध्वनीवरून पवारांशी बातचीत केल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यापुढे तुमच्याबरोबर काम करायला अधिक सोपे पडेल, असे श्रीनिवासन यांनी पवारांना स्पष्टपणे सांगितले. भविष्यात दोघांनीही एकमेकांबद्दल चांगला भाव मनात ठेऊन काम करण्याचे ठरविले असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
दालमिया यांचा मुलगा बीसीसीआयची सर्व सूत्रे सांभाळत असून या गोष्टीवर श्रीनिवासन यांची तीव्र नाराजी आहे. बीसीसीआयच्या विविध समित्या कशाप्रकारे तयार करण्यात येत आहेत, याबद्दल दालमियांचा मुलगा कोणतीही माहिती देत नाही. त्यामुळे हैराण झालेल्या श्रीनिवासन यांनी ऑस्ट्रेलियात असताना पवारांशी बोलणी केली. शरद पवार हेदेखील जुन्या गोष्टी विसरून एकत्र काम करायला तयार असल्याचे श्रीनिवासन यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
मार्च महिन्यात झालेल्या बीसीसीआयच्या सचिवपदाच्या निवडणुकीत पवार गटाच्या अनुराग ठाकुर यांनी श्रीनिवासन यांच्या गोटातील संजय पटेल यांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर पवारांनी एका मुलाखतीदरम्यान, बीसीसीआयमधील एकाधिकारशाही संपुष्टात आल्याचे म्हटले होते. दालमिया आणि अनुराग ठाकुर नवीन व्यवस्था निर्माण करतील. बीसीसीआयला रिमोट कंट्रोलने चालवायचे दिवस आता गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेट बोर्डाची प्रतिमा मलिन होऊ नये, केवळ यासाठीच श्रीनिवास यांना आयसीसीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू देत असल्याचे पवारांनी त्यावेळी सांगितले होते.
मात्र, राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, या उक्तीनूसार, श्रीनिवासन यांनी पवारांशी सलोखा केला आहे. त्यामुळे आगामी काळात बीसीसीआयमध्ये राजकारणाची नवी समीकरणे पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Snubbed by jagmohan dalmiya n srinivasan turns to old foe sharad pawar