मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातील वेतनाचा प्रश्न सुटला आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाला ऑगस्ट २०२५ च्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी ४७१.०५ कोटींचा निधी देण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी काहिशी सुसह्य होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान होतो. परंतु, अनेकदा वेळेत वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होते. त्यामुळे कर्मचाऱ्यास सणवार साजरे करताना हात आखडता घ्यावा लागतो. वेतन वेळेत न झाल्यास उधारीचे पैसे देणे, हफ्ते फेडणे कठीण होऊन बसते. त्यातच दिवाळीला १० दिवस बाकी असल्याने, दिवाळीच्या खरेदीवर विरजण पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, सप्टेंबर महिन्याचे वेतन वेळेत होणार असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचारी स्वतः सण-उत्सव साजरे न करता सर्वसामान्य प्रवाशांची सेवा करतो. परंतु, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत झाल्याने, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची दिवाळी आनंदात जाणार आहे.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या राज्यातील हजारो प्रवाशांसाठी विविध सवलती योजना आहेत. या सवलतीमधून प्रवासी तिकीट दरात ३३ टक्क्यांपासून ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या सवलतींचे उत्तरदायित्व हे राज्य सरकारचे आहे. त्यामुळे ६७ टक्के ते पूर्णपणे तिकीटाचे भाडे हे राज्य सरकार भरते. एसटी महामंडळाला आॅगस्ट २०२५ चे सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी ४७१.०५ कोटी रुपये इतका निधी देण्यात आला आहे.