मुंबई : कलात्मकतेला प्रयोगशीलतेची जोड देत वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर भक्ती आणि शौर्याचा संगम असलेले विविध चित्रपट २०२५ या वर्षात प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे ऐतिहासिक तसेच भक्तीमय चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील कणकवलीच्या सद्गुरू भालचंद्र महाराजांची गाथा ‘कणकाधीश’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. भालचंद्र महाराज यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त निर्माते हरेश शशिकांत आईर आणि अमृता हरेश आईर यांनी ‘कणकाधीश’ या चित्रपटाची कणकवलीमध्ये नुकतीच घोषणा करीत चित्रपटाच्या फलकाचे अनावरण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगियांचे योगी आणि बहुसंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास ‘कणकाधीश’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येणार आहे. भालचंद्र महाराजांनी केलेल्या अलौकिक कार्याचा पट ‘कणकाधीश’ चित्रपटातून उलगडणार आहे. ‘योगतपस्वी, कणकाधिपती परमहंस भालचंद्र महाराजांची महती, अध्यात्मिक सामर्थ्याची प्रचीती, महाराजांच्या जीवनचरित्रातील अनुभवांचे भावस्पर्शी सादरीकरण प्रत्येकाला महाराजांच्या सान्निध्याची नक्कीच अनुभूती देईल’, असा विश्वास मृद्रा व्हिज्युअल प्रोडक्शन्सचे संस्थापक आणि ‘कणकाधीश’ चित्रपटाचे निर्माते हरेश शशिकांत आईर यांनी व्यक्त केला.

मृद्रा व्हिज्युअल प्रोडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘कणकाधीश’ चित्रपटाचे लेखन प्रल्हाद कुडतरकर यांनी केले आहे, तर विविध कोरगावकर दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. छायाचित्रण कौशल गोस्वामी, संगीत दिग्दर्शन साई – पीयुष आणि कलादिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे आहे. मिलिंद शिंगटे सहनिर्माते असलेल्या या चित्रपटासाठी छत्रपती स्टुडिओ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर कणकवलीकरांसह कोकणवासीय तसेच भालचंद्र महाराजांच्या भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of sadguru bhalchandra maharaj will be depicted in marathi film kankadhish mumbai print news sud 02