राजकीय वरदहस्त आणि वरिष्ठांची हुजरेगिरी करून वर्षांनुवर्षे पालिकेच्या इमारत प्रस्ताव, विकास नियोजन, तसेच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातील मलईदार विभागांमध्ये तब्बल १३८ अधिकारी-कर्मचारी अधिराज्य गाजवीत असून त्यांच्याविरोधात सुधार समितीच्या बैठकीत ताशेरे ओढण्यात आले. या कर्मचारी-अधिकाऱ्यांना आशीर्वाद असलेल्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करा, अशी मागणी समाजवादी पार्टीकडून करण्यात आली.
मुंबई महापालिकेचे इमारत प्रस्ताव आणि विकास नियोजन विभाग हे मलईदार विभाग म्हणून ओळखले जातात. या विभागांमध्ये कायम विकासकांचा राबता असतो. विकास नियोजन विभागात ८७, इमारत प्रस्ताव विभागात ५६ अधिकारी-कर्मचारी वर्षांनुवर्षे कार्यरत आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंते, साहाय्यक अभियंते, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, शिपाई आदींचा समावेश आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणात चार अधिकारी एकाच पदावर गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांची साधारण तीन वर्षांनी बदली केली जाते. मात्र राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आणि वरिष्ठांची हुजरेगिरी करून हे अधिकारी-कर्मचारी वर्षांनुवर्षे या विभागात कार्यरत आहेत, असा आरोप नगरसेवकांनी सुधार समितीच्या बैठकीत केला.
तीन वर्षांपेक्षा अधिक काळ किती कर्मचारी या तीन विभागात कार्यरत आहेत, असा हरकतीचा मुद्दा त्यांनी एक महिन्यापूर्वी उपस्थित केला होता.  मलईदार विभागात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी सर्वच पक्षांच्या सदस्यांनी या वेळी केली. गेली १० वर्षे या तीन विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची, तसेच त्यांना वरदहस्त असलेल्या राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.