मुंबई : गाळपासाठी उसाची कमी उपलब्धता, हंगाम सुरू होण्यास झालेला विलंब आणि साखर उताऱ्यात झालेली घट आदी कारणांमुळे देशाच्या साखर उत्पादनात १८ टक्क्यांनी घट झाली आहे. १५ मेअखेर देशाचे साखर एकूण साखर उत्पादन २५७.४० लाख टनांवर गेले आहे. गतवर्षी ३१५.४० लाख टन साखर उत्पादन झाले होते. सध्या देशभरात फक्त चार कारखाने सुरू आहेत.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात १५ मेपर्यंत एकूण साखर उत्पादन सुमारे १८ टक्क्यांनी कमी झाले आहे. २०२३-२४ मध्ये ३१५.४० लाख टन साखर उत्पादन झाले होते, त्या तुलनेत चालू हंगामात ५८ लाख टनांनी घट होऊन २५७.४० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. एकीकडे गाळपासाठी उसाची उपलब्धता घटली असतानाच दुसरीकडे सरासरी साखर उताऱ्यातही घट झाली आहे. गतवर्षीच्या १०.१० टक्क्यांवरून, चालू हंगामात ९.३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे, म्हणजे यंदा ०.८० टक्क्यांनी उतारा घटला आहे.

ऊस गाळप ३५४ लाख टनांनी घटले

देशात यंदा उस गाळपही २७६७.७५ लाख टनांपर्यंत खाली आले आहे. गतवर्षी ३१२२.६१ लाख टन गाळप होते. गतवर्षाच्या तुलनेत ३५४.८६ लाख टनांनी घट झाली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनात सर्वाधिक घट झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत महाराष्ट्राचे उत्पादन २९.२५ लाख टनांनी घटले आहे. यंदा ८०.९५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, गतवर्षी ११०.२० लाख टन झाले होते. उत्तर प्रदेश ९२.७५ लाख टन उत्पादन झाले आहे. गतवर्षी १०३.६५ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा १०.९० लाख टनांनी घट झाली आहे. कर्नाटकात ४०.४० लाख टन उत्पादन झाले आहे. गतवर्षी ५१.४० लाख टन उत्पादन झाले होते, यंदा ११ लाख टनांनी घट झाली आहे. गुजरातमध्ये १०.३० लाख टन उत्पादन झाले आहे. तामिळनाडू, बिहार आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये साखर उत्पादनात घट झाली आहे. अपवादात्मक स्थितीत उत्तराखंडमध्ये उत्पादनात काहीशी वाढ झाली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

हंगामअखेर २६१ लाख टन उत्पादन शक्य

सध्या तमिळनाडूत तीन आणि उत्तर प्रदेशात एक, असे देशात चार कारखाने सुरू आहेत. त्यामुळे हंगाम अखेर देशाचे साखरेचे उत्पादन २६१.१० लाख टन होण्याचा अंदाज आहे. देशात हंगामाच्या अखेरीस म्हणजे निर्यात, घरगुती साखरेचा उपयोग आणि इथेनॉलसाठी वळविलेली साखर वगळून हंगामाच्या अखेरीस ४८ ते ५० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील हंगाम सुरू होईपर्यंत म्हणजे ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२५ पर्यंत साखरेचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणविणार नाही. तसेच अनुकूल पावसाळी परिस्थिती आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वाढलेल्या ऊस लागवडीमुळे २०२५-२६ साखर हंगामात गाळपासाठीच्या उसात २० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.