कारागृहातील पाणीपुरवठ्याची शहानिशा करण्याचे आदेश

मुंबई : नवी मुंबईस्थित तळोजा कारागृहातील कैद्यांना दररोज दिवसभरात अवघी अर्धी किंवा बादलीभर पाणी मिळत असल्याच्या आरोपाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच कारागृहात मुबलक पाणी उपलब्ध केले जाते की नाही याची शहानिशा करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांना तळोजा कारागृहाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पाहणीचा अहवाल २२ जून रोजी सादर करण्याचे आदेश दिले. तळोजा कारागृह हे भारतातील सर्वात मोठ्या कारागृहांपैकी एक असून तेथे दोन हजार १२४ कैदी बंदिस्त आहेत.

कारागृह अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत प्राधिकरणाच्या सचिवांनी शनिवारी (१७ जून) तळोजा कारागृहाला भेट द्यावी. तसेच तेथे त्यांनी कैद्यांशी संवाद साधावा आणि कारागृहात उपलब्ध केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासावी, असे आदेशही न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने प्राधिकरणाच्या सचिवांना दिले. एवढेच नव्हे, तर प्राधिकरणाचे सचिवा कैद्यांशी संवाद साधतील त्यावेळी कारागृहामधील एकाही अधिकाऱ्याने तेथे उपस्थित राहू नये. त्याच वेळी गृहविभागाच्या उपसचिवांसह, रायगडचे जिल्हाधिकारी आणि सिडकोच्या जबाबदार अधिकाऱ्याने मात्र या पाहणीच्या वेळी उपस्थित राहावे, असेही न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले.