बेस्ट उपक्रमाने बसचे तिकीट काढताना होणारा रोख रक्कमेचा व्यवहार टाळण्यासाठी डिजीटल तंत्रज्ञानावर आधारित ‘टॅप इन टॅप आऊट’ सेवाही सुरू केली. मात्र सध्या मोजक्याच बसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसांमध्ये बेस्टच्या ताफ्यातील आणखी १०० बसगाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुट्ट्या पैशांवरून वाहकासोबत होणाऱ्या वादापासून प्रवाशांची सुटका –

बेस्ट उपक्रमाच्या ‘टॅप इन टॅप आऊट’ सेवेचा ‘बेस्ट चलो स्मार्ट कार्ड’, तसेच ‘चलो’ मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना लाभ घेता येतो. यासाठी बसच्या पुढील आणि मागील दरवाजाजवळ ॲप किंवा कार्ड टॅप करण्यासाठी यंत्र बसविण्यात आले आहे. बसच्या पुढील दरवाजातून प्रवेश करणाऱ्या प्रवाशाला आपले स्मार्ट कार्ड किंवा चलो ॲप यंत्रा टॅप करावे लागते. त्यानंतर मागील दरवाजातून उतरताना पुन्हा हीच प्रक्रिया करावी लागते. तिकीट उपलब्ध होताच प्रवाशाच्या खात्यातून तिकीटाचे पैसे वजा होतात. यामुळे सुट्ट्या पैशांवरून वाहकासोबत होणाऱ्या वादापासून प्रवाशांची सुटका झाली आहे. त्याचबरोबर बस वाहकावरील कामाचा ताणही कमी होत आहे.

सध्या ३५ बसगाड्यांमध्येच ‘टॅप इन टॅप आऊट’ सेवा –

सध्या ३५ बसगाड्यांमध्येच ‘टॅप इन टॅप आऊट’ सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना चलो स्मार्ट कार्ड किंवा चलो मोबाइल ॲप असूनही ‘टॅप इन, टॅप आऊट’ सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने आणखी १०० बसगाड्यांमध्ये ‘टॅप इन, टॅप आऊट’ सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या १५ ते २० दिवसांमध्ये टप्प्याटप्यात १०० बसगाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. येत्या काही महिन्यात या सेवेचा विस्तार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tap in tap out service in 100 more buses of best soon mumbai print news msr