मुंबई : गर्भाशयाच्या मुखासंदर्भातील कर्करोगाविरोधात लढा देण्यासाठी टाटा ट्रस्टने ‘खुद से जीत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची वेळीच तपासणी करणे आणि आरोग्याची काळजी घेण्याची सूचना करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत टाटा ट्रस्टने झारखंड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रामध्ये केलेल्या २६ हजारांहून अधिक महिलांची तपासणी केली आहे.

भारतीय स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. यामुळे दरवर्षी जवळजवळ ७५ हजार महिलांना आपले जीव गमवावे लागतात. या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते. या कर्करोगाच्या लक्षणांविषयी महिलांमध्ये जागरुकतेचा प्रचंड अभाव असल्याने किंवा भीती, शरमेची भावना आणि मौन बाळगण्याने हा आजार बळावण्याची शक्यता वाढते. यातूनच तळागाळातील घटकांशी संवाद साधून टाटा ट्रस्टने राज्य सरकार व सहयोगी संस्थांच्या साथीने झारखंड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रामध्ये केलेल्या २६ हजारांहून अधिक गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये समस्या, स्क्रीनिंगमध्ये येणारे अडसर, प्रमुख उपाययोजना यांचे स्वरूप मांडण्यासाठी व भारतामध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगासंदर्भात चर्चेला नवी दिशा कशी देता येईल, याचा शोध घेण्यासाठी ऑन्कोलॉजी, सायको-ऑन्कोलॉजी आणि रुग्ण आधार या क्षेत्रातील अग्रगण्य तज्ज्ञ एकत्र आले.

स्त्रियांचे मौन, त्यांची भीती, त्यांचा संकोच यांचा कानोसा घेण्यातून ‘खुद से जीत’चा जन्म झाला. गर्भाशय मुखाचा कर्करोग ही केवळ एक वैद्यकीय समस्या नाही; तर ती एक भावनिक समस्या आहे. सोयीसुविधांची उपलब्धता हा एकमेव अडथळा नसून, त्यामागे शंकेचा सूर असतो, महिलांनी हे करू नका, बोलू नका किंवा स्वत:ला प्राधान्य देऊ नका असे सांगण्यात येत असल्याचे या उपक्रमातून लक्षात आले. या माेहिमेमधून महिलांना जागे करण्याचा त्यांचे आरोग्य महत्त्वाचे असून, त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत, असे सांगण्याचा या उपक्रमातून प्रयत्न केला असल्याचे टाटा ट्रस्टच्या कम्युनिकेशन स्पेशालिस्ट शिल्पी घोष यांनी सांगितले.