मुंबई : हिंदुस्थानी संगीत, कर्नाटकी संगीत असे शास्त्रीय संगीतातील वेगवेगळे प्रवाह असले तरी त्यात कुठलाच भेदभाव नसतो, असे सांगतानाच कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ ही कविता उधृत करत ‘संगीत म्हणजे संगीत म्हणजे संगीत असतं, नॉर्थ आणि साऊथ एकच असतं,’ अशा शब्दांत तालवाद्यांचे बादशाह तौफिक कुरेशी यांनी संगीताच्या सर्वसमावेशकतेची जाणीव करून दिली. श्वासातून, शरीराच्या हालचालीतून कशा पद्धतीने लयकारी निर्माण होते याचे सादरीकरण, तालसंगीताच्या क्षेत्रातील त्यांचे अनुभव, अब्बाजींच्या आठवणी अशा दोन तासांच्या गप्पांची मैफल रंगवल्यानंतर आता कुठे खरा गप्पांचा सूर सापडला आहे म्हणणारे दिलखुलास तौफिक कुरेशी रसिकांनी ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमातून अनुभवले.
जगप्रसिद्ध तालवादक म्हणून नावाजलेल्या तौफिक कुरेशी यांच्याशी मनमोकळ्या ‘लोकसत्ता गप्पां’चा कार्यक्रम शनिवारी, वरळीतील नेहरू सेंटर येथे रंगला. भारतीय शास्त्रीय संगीतातील दिग्गज कलावंत, मराठी नाट्य व चित्रपट तसेच संगीत क्षेत्रातील मान्यवर श्रोत्यांची उपस्थिती आणि तौफिक कुरेशी यांच्याबरोबर खुललेल्या गप्पांनी ही संध्याकाळ तालमय झाली. प्रसिद्ध लेखक, गायक डॉ. आशुतोष जावडेकर आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तबल्यावर त्यांचे प्रभुत्व असले तरी ड्रम, जेम्बे यासारख्या परदेशी वाद्यांवर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे तालवादक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. घरात तबला असताना जेम्बेसारखे वाद्या त्यांना का भावले, याविषयी सांगताना, लहानपणापासूनच वेगळे काही ताल- सूर कानावर पडले की मनाला जणू त्यांचे वेड लागायचे. पुढे संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या संगीताचा अधिक प्रभाव पडला आणि तबल्याबरोबरच इतर वाद्यांमधून लयकारी कशी करता येईल याचा शोध सुरू असतानाच झाकीरभाईंनी छोटेखानी जेम्बे हे वाद्या आपल्या हातात ठेवले. वडिलांकडून मिळालेले तालवाद्याचे धडे आणि आपल्यातली नवसंगीताची ऊर्जा यातून झेंबेवर वेगळे ताल संगीत निर्माण करता येईल, असा विश्वास वाटला. त्या वाद्याशी आपसूक नाळ जोडली गेली, अशी आठवण तौफिक कुरेशी यांनी सांगितली.
उस्ताद अल्लारखा हे वडील म्हणून जेवढे प्रेमळ होते तेवढेच गुरू म्हणून कडक शिस्तीचे होते, याबद्दलची आठवण सांगताना नकळत त्यांनी आपल्यात नवनिर्मितीचा ध्यास कसा रुजवला हेही त्यांनी सांगितले. लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे संस्कार मनावर इतके कोरले गेले आहेत, की समोर वाद्या कुठलेही असो तेच संगीत वाजवले जाते, असे त्यांनी सांगितले. घरात तबलावादनाचा वारसा असतानाही चित्रपट संगीताविषयाचे आकर्षण आणि राजेश रोशन, शंकर महादेवन, आनंद मिलिंद, नदीम श्रवण यांसारख्या संगीतकारांबरोबर केलेल्या चित्रपट संगीताच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. फिनोलेक्स पाइपच्या जाहिरातीसाठी केवळ तोंडाने काढलेल्या आवाजाच्या जोरावर तयार केलेली जिंगल, धूम २ चित्रपटातील धूम मचाले या गाण्यासाठी केलेले वेगळ्या प्रकारचे तालसंगीत अशा विविध संगीत प्रयोगांविषयीच्या आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. तरुण कलाकारांबरोबर त्यांचा होणारा सहजसंवाद, चित्रपट संगीतात होत गेलेले बदल, एआयसारख्या तंत्रज्ञानाचा शास्त्रीय संगीतावर काही परिणाम होऊ शकतो का? अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.
जेम्बेचे बहारदार वादन आणि शब्दांची लयकारी
तौफिक कुरेशी यांच्या जेम्बे वादनाने संपूर्ण सभागृह काही काळासाठी तालांच्या जादूने भारून गेले. जेम्बेवर पडणारा तौफिकजींचा तालठोका आणि त्यांनी प्रस्तुत केलेली शब्दांची लयकारी याने कार्यक्रमात रंगत आणली. जेम्बेवर लेझिमचा ठेका धरत रेला वाजवणाऱ्या तौफिक कुरेशी यांच्याबरोबर श्रोतेही एकरूप झाले. त्यांचे जेम्बे वादन आणि रसिकांच्या टाळ्या दोन्हीचा ताल समेवर येत या गप्पांच्या मैफिलीचा समारोप झाला.
प्रायोजक
● पॉवर्ड बाय : व्ही. एम. ज्वेलर्स, बाविस्कर ग्रुप