मुंबई: दादरमधील शिवाजी पार्क मैदानावरील माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज सकाळी अज्ञात इसमाने लाल रंग फेकल्याने तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणाची दखल गृहखात्याने घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांची तीन विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. दोषींना लवकरात लवकर शोधून कारवाई करू, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

दादरच्या शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत आदराचे स्थान आहे. शिवाजी पार्कला येणारे शिवसैनिक माँसाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतात.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

या पुतळ्यावर बुधवारी सकाळी कुणी तरी लाल रंग टाकलयाचे आढळले. ही बातमी पसरतात संतप्त शिवसैनिकांनी शिवाजी पार्क मैदानात गर्दी केली. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांची तीन विशेष पथके स्थापन

हा विषय आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. माँसाहेब तमाम शिवसैनिकांच्या आई होत्या. दोषींना शोधून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

शिवसैनिक संतप्त

माँसाहेबांच्या पुतळ्याचे संरक्षण करण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, असा आरोप शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या घटनेचा निषेध केला असून संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेतुपुरस्सर कृत्य ?

जाणूनबुजून हे कृत्य केल्याची शंका आमदार महेश सावंत यांनी व्यक्त केली आहे. भारत – पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात पक्षाने केलेल्या ‘माझे सिंदूर, माझा देश’’ आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून हे कृत्य झाले असावे, अशीही शंका त्यांनी व्यक्ती केली. पुतळ्याची तोडफोड करण्यासाठी वापरलेला लाल ऑइल पेंट पाहता या शक्यतेला बळकटी मिळते, असेही त्यांनी सांगितले.