मुंबई : sexual abuse of two minor girls at a school in Badlapur. बदलापूर येथील शाळेच्या आवारात दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर निलंबित करण्यात आलेले ठाण्याचे शिक्षणाधिकारी भाळासाहेब राक्षे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, निलंबनाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. आपल्याला या प्रकरणी नाहक गोवण्यात आले असून आपल्यावरील निलंबनाची कारवाई ही राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा दावा राक्षे यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राक्षे यांनी सुरूवातीला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) निलंबनाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. परंतु, न्याधिकरणाने कोणताही दिलासा न दिल्याने राक्षे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, निलंबनाच्या कारवाईला स्थगिती देण्याची, अर्जावर अंतिम निर्णय दिला जाईपर्यंत या पदी अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यापासून सरकारला मज्जाव करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> शरद रावांच्या संघटनेचा फेरीवाला निवडणुकीवर बहिष्कार, दिवंगत कामगार नेते शरद राव, २९ ऑगस्टच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

पूर्वप्राथमिकच्या नियमन आणि पर्यवेक्षणाशी संबंधित नसतानाही आपले निलंबन करण्यात आले. त्यामुळे, निलंबनाचा राज्य सरकारचा निर्णय मनमानी, भेदभाव करणारा आणि चुकीचा आहे. हा निर्णय राजकीयदृष्ट्या प्रेरित असून त्याद्वारे आपल्याला या सगळ्या प्रकरणात नाहक गोवण्यात आल्याचा दावा राक्षे यांनी याचिकेद्वारे केला आहे. न्यायमूर्ती अनिल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पीटाल यांच्या खंडपीठासमोर राक्षे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाची पळापळ

बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर आपण अंबरनाथ गट शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना शाळेला भेट देण्याचे आणि, चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या अधिकाऱ्याने २० ऑगस्ट रोजी चौकशी अहवाल सादर केला. त्यानुसार, आपण शाळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचा दावा राक्षे यांनी याचिकेत केला आहे. शाळेतील सीसी टीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबतही आपण नोटिशीत प्रश्न उपस्थित केला होता. हा चौकशी अहवाल पुण्यातील शिक्षण संचालक (प्राथमिक) आणि मुंबईतील शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) यांच्याकडे पाठवल्याचा दावाही राक्षे यांनी याचिकेद्वावारे केला आहे. चौकशी अहवालाच्या आधारे आपण बदलापूर येथील संबंधित शाळेच्या व्यवस्थापनासाठी प्रशासकांची समिती स्थापन केली. सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन करण्यासह सीसी टीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी बसवण्याचे आदेश दिले. एवढे सगळे करूनही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपले निलंबन केल्याचे जाहीर केल्याचा दावा राक्षे यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane education officer challenges suspension over badladpur sex assault in bombay hc mumbai print news zws