मुंबई : नरिमन पॉइंट परिसरातील कार्यालये उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे या भागातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाण्यासाठी रात्री ९ नंतर बस मिळत नाही. त्यामुळे फ्री प्रेस जर्नल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणारी बेस्टची बस क्रमांक १११ आणि वातानुकूलित बस क्रमांक ११५ च्या फेऱ्या आता रात्री १०.३० पर्यंत वाढविण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध गायक सोनू निगमला ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाकडून धक्काबुक्की, पोलिसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “या प्रकरणी…”

हेही वाचा – मुंबईः मर्चन्ट नेव्हीमध्ये नोकरी देण्याचे आमीष दाखवून ६० जणांची फसवणूक; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

फ्री प्रेस जर्नल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान बेस्टची बस क्रमांक १११ आणि वातानुकूलित बस क्रमांक ११५ धावते. या दोन्ही बस क्रमांकाच्या बसगाड्या रात्री ९ पर्यंत चालविण्यात येतात. शेवटची बस रात्री ९ वाजता गेल्यानंतर प्रवाशांना टॅक्सीवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक वेळा टॅक्सीचालक जवळचे भाडे नाकारत असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर बस मार्ग क्रमांक १११ आणि वातानुकूलित बस मार्ग क्रमांक ११५ च्या फेऱ्यांमध्ये १०.३० पर्यंत वाढ करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. ही मागणी बेस्ट उपक्रमाने मान्य केली आहे. आता या दोन्ही बसची शेवटची फेरी रात्री ९ ऐवजी रात्री १०.३० वाजता होईल. या दोन्ही बसच्या फेऱ्या दर १५ मिनिटांनी होतील, असे बेस्ट अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.