मुंबई : मुंबई महानगरपालिकेने उपनगरीय रुग्णालयांच्या खासगीकरणासाठी मागविलेल्या निविदांपैकी गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयासाठी तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. लवकरच पात्र संस्थेची निवड करण्यात येणार असून हे रुग्णालय चालविण्याची जबाबदारी त्या संस्थेवर सोपवण्यात येणार आहे. या रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचीही मुंबई महानगरपालिकेची योजना आहे. त्यामुळे या रुग्णालयामध्ये भविष्यात तृतीय श्रेणीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

नागरिकांना परवडणाऱ्या आणि सुलभ आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने विकास नियोजन आराखडा २०३४ अंतर्गत सार्वजनिक – खाजगी भागीदारी (पीपीपी) धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील काही उपनगरीय रुग्णालयांचा पीपीपी तत्त्वावर विकास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये गोवंडीतील शताब्दी रुग्णालयाच्या पीपीपी विकासासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. अतिविशेषोपचार रुग्णालय चालविण्याचा किमान ५ ते १० वर्षांचा अनुभव असलेल्या कंपन्यांची यासाठी निवड केली जाणार आहे. निवड होणाऱ्या कंपनीला ३० वर्षांसाठी रुग्णालय भाडेतत्त्वावर देण्याचा महानगरपालिकेचा विचार आहे. त्यामुळे निविदा अर्ज केलेल्यांबरोबर चर्चा करून संस्थेची निवड करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या अतिविशेषोपचार रुग्णालयातील १०० रुग्णशय्यांपैकी ३३ टक्के रुग्णशय्या महानगरपालिकेची विविध रुग्णालये, दवाखान्यांतून पाठविण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी राखीव असणार आहेत. मात्र या अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील उपचारासाठी किमान ३०० ते ३५० रुपये भरावे लागणार आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागामध्ये १० रुपयामध्ये उपचार होत आहेत. रुग्णांना आपत्कालीन सेवेतील एका रुग्णशय्येसाठी दररोज १२० रुपये, मलमपट्टीसाठी ३०० रुपये माेजावे लागणार आहेत.

पीपीपी धोरण ठरले अपयशी

यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने अंधेरीमधील सेव्हन हिल्स रुग्णालय पीपीपी तत्त्वावर चालविण्यासाठी दिले हाेते. सध्या याबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या अंधेरी येथील बीएसईएस रुग्णालयाचीही अशीच अवस्था असल्याचे सांगत समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी पीपीपी धोरणावर टीका केली.

खाजगीकरणामुळे कर्मचाऱ्यांवर संकट

रुग्णालयांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय कामगारविरोधी आहे. अनेक वर्षांपासून रुग्णालयांमध्ये रुग्णांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतरत्र पाठवले जात आहे किंवा त्यांची पदे रद्द केली जात आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कर्मचारी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे म्युनिसिपल कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.