मुंबई : कूपर रुग्णालयात तीन डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणी रुग्णालयातील निवासी डॉक्टर व आंतरवासिता डॉक्टरांनी शनिवार सायंकाळपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर रविवारपासून दिसून येत आहे. सोमवारी सकाळी रुग्णालयामध्ये नियमित तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलांना त्रासाला सामारे जावे लागले. अनेक महिला सकाळी ८ वाजता येऊन बाह्यरुग्ण विभागासमोर रांगा लावून बसल्या होत्या. मात्र त्यांची नोंदणी दुपारी दोन वाजता करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली.
कूपर रुग्णालयातील डाॅक्टरांनी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलन करत बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याचा परिणामी सोमवारी बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेवर काहीशा प्रमाणात दिसून आला. रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी वरिष्ठ डॉक्टर, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची बाह्यरुग्ण विभागामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी रुग्णांवर उपचार केले असले तरी बाह्यरुग्ण विभागाबाहेर रुग्णांची काही प्रमाणात गर्दी दिसून येत होती.
कूपर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागामध्ये अंधेरी, बोरिवलीसह नायगाव, वसई व विरार येथून अनेक गर्भवती महिला उपचारासाठी येतात. यातील अनेक महिलांची नियमित तपासणी असल्याने त्यांची सोनोग्राफी चाचणी करायची असल्याने त्यांना उपाशीपाेटी येण्यास सांगण्यात आले होते. या महिला सकाळी ८ वाजल्यापासून विभागाबाहेर रांगा लावून बसल्या होत्या. त्यामुळे जवळपास ७० ते ८० महिला सकाळपासूनच रांगेमध्ये उभ्या होत्या. परंतु डॉक्टरांच्या संपाबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती गर्भवती महिलांना देण्यात आली नसल्याने त्या तशाच दुपारपर्यंत रांगा लावून बसल्या होत्या. अखेर दुपारी २ वाजता या महिलांची नोंदणी प्रक्रिया सुरू करून त्यांची तपासणी सुरू करण्यात आली.
सकाळपासून दुपारपर्यंत काही महिला उपाशीपाेटी रांगेत उभ्या राहिल्या होत्या. नायगाव येथून तपासणीसाठी आलेली प्रीती ही पाच महिन्यांची गर्भवती महिला सकाळपासून उपाशीपोटी होती. डॉक्टर कधी येणार याबाबत कोणीही नीट माहिती देत नव्हते. रविवारी डाॅक्टर नसल्याने आपत्कालिन विभागात येणाऱ्या रुग्णांवर वरिष्ठ डॉक्टरांकडून उपचार करण्यास टाळाटाळ करण्यात येत आल्याने अनेक रुग्णांना रुग्णांना अन्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. तर वरिष्ठ डॉक्टर बाह्यरुग्ण विभागामध्य विलंबाने आल्याने रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
