मुंबई : बेस्ट बसची अपुरी सेवा आणि रेल्वेच्या गर्दीतून सुटका मिळविण्यासाठी उच्च उत्पन्न गटातील नोकरदार वर्गासाठी ‘अ‍ॅप’ आधारित बससेवा मोठा दिलासा ठरली होती. या बसमधून दररोज सुमारे ४० ते ५० हजार प्रवासी प्रवास करीत होते. परंतु परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परवानगी न घेताच सुरू असलेली ‘अ‍ॅप’ आधारित बससेवा बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर उबर शटल सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर ताण वाढला आहे. तसेच परिवहन मंत्र्यांच्या अनपेक्षित हस्तक्षेपामुळे प्रवासी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे.

प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वे सेवा, सार्वजनिक बस सेवा अनेकांना गैरसोयीची वाटते. खासगी वाहनांसाठी पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यामुळे ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक जण ‘अ‍ॅप’ आधारित बससेवेचा वापर करत होते. सिटी फ्लो, उबर शटल, चलो व इतर ‘अ‍ॅप’ आधारित बससेवा मुंबई महानगरात सुरू आहेत. परंतु ‘अ‍ॅप’ आधारित वाहने कायदेशीर तत्त्वांचे पालन करत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

योग्य परवाने न घेता ‘अ‍ॅप’ आधारित वाहने बेकायदा धावत आहेत. अशा अनधिकृत सेवांवर कारवाई करण्याच्या सूचना सरनाईक यांनी ‘आरटीओ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर दोन दिवसांत उबर शटल सेवा बंद झाली. मात्र सिटी फ्लो आणि चलो अ‍ॅप सेवा सुरू असून तीही बंद होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महानगरातील रेल्वे आणि बेस्ट सेवेवरील वाहतुकीचा भार कमी करण्याच्या दृष्टीने ‘अ‍ॅप’ आधारित बससेवा उपयोगी पडत होती. उलवे भागातून सुमारे ४० बस वांद्रे- कुर्ला संकुल, मालाड, बोरिवली, नरिमन पॉंइट या भागांत येतात. यातून सुमारे सहा हजार प्रवासी प्रवास करीत होते. परंतु राज्य सरकारने अचानक ‘अ‍ॅप’ आधारित बससेवावर कारवाईचा निर्णय घेतल्याने सरकारच्या हेतूविषयी शंका निर्माण झाली आहे. – हर्ष कोटक, सरचिटणीस, बसमालक संघटना

राज्य सरकारने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवासी, बस चालक आणि बस मालक यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून बस तशाच उभ्या असल्याने व्यवसाय ठप्प होण्याची भीती आहे. – सुरेश गाला, बसमालक

बेस्ट बसची अपुऱ्या सेवा आणि रेल्वेत होणारी गर्दी यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी अ‍ॅग्रीगेटर बस उत्तम पर्याय होतो. परंतु या बसगाड्यांवर शुक्रवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. परिणामी बससेवा बंद झाल्याने चालकांचा रोजगार बुडाला आहे. – विनय सिंग, बसमालक

प्रवाशांना फटका

सध्या मुंबई महानगर प्रदेशात ‘अ‍ॅप’ आधारित सुमारे ८०० बस चालवल्या जातात. त्यापैकी ५०० बस उबर शटल सेवेच्या आहेत. त्यामुळे ‘अ‍ॅप’ आधारित बससेवेत उबर शटल महत्त्वाची सेवा आहे.

परंतु परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केल्याने, शुक्रवारपासून ‘अ‍ॅप’ आधारित वाहनांची संख्या कमी होऊ लागली, तर शनिवारी उबर शटल सेवा पूर्णपणे बंद झाली. सिटी फ्लोच्या काही बस धावत होत्या. मोठ्या संख्येने धावणाऱ्या उबर शटलच्या बस बंद झाल्यामुळे प्रवाशांना फटका बसला.

या प्रवाशांना वाहतुकीचे इतर पर्याय शोधण्यासाठी धावपळ करावी लागेल. दरम्यान, उबर अ‍ॅपवरून उबर शटल सेवेचा पर्याय बंद करण्यात आला आहे, अशी माहिती उबरच्या प्रवक्त्यांनी दिली.