शैलजा तिवले
टाळेबंदीमुळे क्षयरुग्णांना नियमित तपासणी आणि औषधे घेण्यासाठी रुग्णालये, उपचार केंद्रावर पोहचणे जिकिरीचे होत आहे. याचा बहुतांश फटका मुंबईतील रुग्णांना बसत असून नव्या रुग्णांचे निदान करण्यातही अडचणी येत आहेत.
शिवडी येथील पालिकेच्या क्षय रुग्णालयात दिवसाला सुमारे २५० रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात येतात. पालघर, ठाणे या जिल्ह्य़ांमधूनही अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येतात. टाळेबंदीमुळे रुग्णालयाच्या जवळपासचे मोजके रुग्ण वगळता हे सर्व रुग्ण नियमित तपासण्यांसाठी पोहचू शकलेले नाहीत, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित आनंदे यांनी सांगितले.
राज्यात सुमारे २ लाख क्षयरुग्ण असून यातील सर्वाधिक म्हणजे ४५ हजाराहून अधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये क्षयरुग्णांच्या उपचारासाठी केंद्रे उपलब्ध असली तरी टाळेबंदीमुळे येथून नमुने तपासणीसाठी जाण्याची व्यवस्थाही खंडित झाल्याने नव्या रुग्णांच्या चाचण्या निदान करणे अवघड होत आहे. टाळेबंदीचा काळ वाढला असून औषधांचा साठाही संपला असल्याचे वॉर्डमधील डॉक्टरांनी सांगितले.
गेल्या दोन आठवडय़ात मुंबईत चार क्षयरुग्णांचे मृत्यू झाले आहेत. क्षयरुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. एक्सडीआर क्षयरुग्ण असलेल्या तरुणीचे उपचार ठाण्याच्या रुग्णालयात सुरू असून ती पुण्यातील खेडेगावात राहते. तिची औषधे संपली असल्याने कशी पोहचविता येतील, याची तजवीज आम्ही करत असल्याचे क्षयरुग्णांसाठी कार्यरत असलेले कार्यकर्ते गणेश आचार्य यांनी सांगितले.
क्षयरोगाचीही लक्षणे ताप, खोकला अशीच असल्याने रुग्ण भीतीने तपासणीसाठी येत नाहीत असे आम्हाला वाटते. हे अधिक धोकादायक असून यामुळे क्षयरोगाचा संसर्ग वाढू शकतो, असे फुप्फूसरोगतज्ज्ञ डॉ. विकास ओसवाल व्यक्त करतात.
सकस आहाराचा अभाव
क्षयरुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने सकस आहार घेणे आवश्यक आहे. रुग्णांना सकस आहार मिळावा म्हणून सरकारकडून ५०० रुपये प्रतिमहिना दिले जातात. हे पैसेही अजून रुग्णांना मिळालेले नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले.
टाळेबंदीमुळे सर्वाधिक मुंबईतील रुग्णांची अडचण झाली आहे. त्यांना महिनाभराची औषधे देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सोमवारी याबाबत बैठक झाली असून रुग्णांच्या खात्यावर पैसे जमा होण्यामध्ये अडचणी येत होत्या. त्याही दूर करून पैसे जमा करण्याचे किंवा त्यांच्यापर्यंत पोहचविण्याबाबत संबंधितांना कळविले असल्याचे राज्य क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले.
औषधांचा प्रतिरोध वाढण्याचा धोका
क्षयरुग्णाने नियमित औषधे न घेतल्यास औषधांचा प्रतिरोध होण्याचा धोका असतो. एमडीआर आणि एक्सडीआर रुग्णांची औषधे चुकली तर प्रतिरोध वाढू शकतो. परिणामी भविष्यात त्यांच्यावर कोणत्याच औषधांचा परिणाम होणार नाही, अशी भीती डॉ. आनंदे यांनी व्यक्त केली आहे.
उपाययोजना शक्य
सर्व रुग्णांचा व्हॉटसअप गट बनविला असून रुग्णांना येणाऱ्या अडचणी, तक्रारी यात नमूद केल्या जातात. यावर गटातील डॉक्टर उपचार सांगतात. इंजेक्शनवर असलेल्या रुग्णांना काही अडचणी येत आहेत. परंतु आमच्या ओळखीच्या काही खासगी रुग्णालयांमध्येही ही सुविधा सध्या सुरू केली आहे.
राज्यात क्षयरुग्णांचा मृत्युदर हा जवळपास सहा टक्के असून वर्षांगणिक वाढत आहे. २०१७ मध्ये राज्यात जवळपास ७६३० जणांचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला आहे. म्हणजेच सरासरी दर महिन्याला ६३५ जणांचा मृत्यू होतो.