‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ ही मुंबई महापालिकेची योजना काही ठिकाणी पालिकेच्या अंगलट आली असली तरी काही भागांत पालिका अधिकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारत २४ तासांच्या आत खड्डे बुजवल्याने स्थानिकांच्या कौतुकाचा विषय ठरते आहे.
ही मोहीम ७ नोव्हेंबरला संपली. पालिकेने १ नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या या मोहिमेत पालिकेने २४ तासांत खड्डे बुजविण्याचे आव्हान स्वीकारले होते. पालिकेच्या या अनोख्या योजनेची संपूर्ण मुंबईत खूप चर्चा झाली. पाचशे रुपये मिळतील या आशेने किंवा पालिकेची परीक्षा घेण्याच्या हेतूने अनेक तक्रारदारांनी खड्डय़ांच्या तक्रारी केल्या.
६ नोव्हेंबपर्यंत १६७० तक्रारी आल्या. त्यांपैकी ११५५ ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांनी तपासणी केली व ११४८ खड्डे बुजवले. यापैकी ९० टक्के खड्डे २४ तासांत भरल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. तर उर्वरित खड्डे २४ तासांनंतर काही तासांतच भरले गेले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पालिका दरवर्षी खड्डे भरण्यासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद करते. मात्र तरीही रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना जरब बसावी म्हणून या वर्षी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी खड्डे दाखवा ही मोहीम ऑक्टोबरमध्ये आखली.
नोव्हेंबरमध्ये साधारणपणे पाऊस गेलेला असतो. त्यामुळे खड्डे भरण्याचे काम तोपर्यंत थांबलेले असते. मात्र यंदा नोव्हेंबरमध्ये ही मोहीम सुरू केल्यामुळे विभाग कार्यालये आणि रस्ते विभागातील अभियंतेही कामाला लागले. २४ तासांचे आव्हान दिल्यामुळे पालिकेची प्रतिष्ठाच पणाला लागली होती. त्यामुळे पालिकेच्या यंत्रणेने अक्षरश एकेका तासातील प्रगतीवर या मोहिमेच्या दरम्यान लक्ष ठेवले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्यामुळे पालिकेची यंत्रणा कधी नव्हे इतकी वेगाने काम करू लागली. अनेक ठिकाणी बारा ते अठरा तासांत खड्डे भरले जात होते, अशी प्रतिक्रिया तक्रारदारांनी जाहीरपणे दिली आहे. समाजमाध्यमांवर या मोहिमेचे कौतुक केले असून ठाणे, हैदराबाद, बंगळूरु येथील लोकांनी आपल्या शहरातही अशी मोहीम सुरू करावी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
६९ टक्के लोकांकडून पाच तारे
पालिके ने या मोहिमेअंतर्गत तक्रारदारांशी संवाद साधून ही मोहीम समाधानकारक आहे का, याबाबत प्रश्न विचारले. त्यात ६९ टक्के लोकांनी पाच तारांकित दर्जा दिला आहे. तर २० टक्के लोकांनी मात्र १ तारा दिला आहे. ३ टक्के लोकांनी शून्य तारे देऊन ही योजना वाईट असल्याचा अभिप्राय दिला आहे.