मुंबई : जुहू येथील समुद्रकिनारी गोदरेज गेट परिसरात शुक्रवारी सकाळी दोन तरुण बुडाल्याची दुर्घटना घडली. दोन युवक समुद्रात पोहत असताना अंदाजे २०० मीटर आत गेले असता ही घटना घडली. त्यापैकी एकाचा जीव वाचवण्यात यश आले. तर दुसरा युवक अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. मात्र दुपारी समुद्राला भरती आल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.
जुहू येथील सिल्व्हर बीच येथे गोदरेज गेट परिसरात सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. दोन तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. पोहताना ते खोल समुद्रा गेले आणि बुडाले. मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागाकडे १०.३० वाजता याबाबतची नोंद करण्यात आली. समुद्र किनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकांनी या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल पोहोचण्याच्याआधी जीवरक्षक जितेंद्र तांडेल यांनी राजकुमार गोविंद सुब्बा (२२) याला समुद्रातून बाहेर काढले आणि वाचवले. दृष्टि लाइफगार्डच्या जितेंद्र तांडेल यांनी जीव धोक्यात घालून राजकुमारचा जीव वाचवला. तर दुसरा तरुण विघ्नेश मुरुगेश देवेंद्रन (२०) खोलवर समुद्रात गेल्याने अद्याप बेपत्ता आहे. अग्निशमन दलाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली.
मात्र दुपारी १.४६ वाजता समुद्राला भरती आल्यामुळे शोधकार्य थांबवावे लागले, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली. दरम्यान, स्थानिक पोलीस व आपत्कालीन यंत्रणा अधिक तपास करीत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.