मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील १४ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परिपत्रक समाजमाध्यमात प्रसिद्ध झाले आहे. मात्र हे परिपत्रक संपूर्णतः बनावट असून मुंबई विद्यापीठाने असे कोणतेही परिपत्रक निर्गमित केलेले नाही. त्यामुळे १४ ऑक्टोबर २०२५पासून सुरु होणाऱ्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
१४ ऑक्टोबर २०२५पासून सुरू होणाऱ्या हिवाळी तृतीय वर्ष सत्र ५च्या परीक्षांमध्ये तृतीय वर्ष बी.कॉम., बीएमएस, बी.कॉम. – ‘अकाउंटिंग अँड फायनान्स’, ‘बँकिंग अँड इन्श्युरन्स’, ‘फायनान्शिअल मार्केट’, ‘इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट’, ‘ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट’, ‘एफएमजी’ आणि बी.कॉम. ‘बीएमएस’, ‘ईएमई’ या परीक्षांचा समावेश असून या सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.
