मुंबई : रेल्वे स्थानकातून घरी जात असलेल्या ७१ वर्षीय वृद्धाला अज्ञात व्यक्तीने बोलण्यात गुंतवून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना भांडुप परिसरात घडली. याबाबत वृद्ध व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे भांडुप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शंकर सुतार (७१) भांडुपमधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात राहतात.

रविवारी सायंकाळी ते भांडुप रेल्वे स्थानकात तिकीट आरक्षण करण्यासाठी गेले होते. सायंकाळी ६ च्या सुमारास ते घरी चालत येत होते. यावेळी येथील ज्वाली स्टुडिओजवळ त्यांना एक अज्ञात व्यक्ती भेटली. त्याने सुतार यांना बराच वेळ बोलण्यात गुंतवले. त्यानंतर त्याने त्यांच्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी, रोख रक्कम काढून घेतली आणि पळ काढला.

काही अंतर पुढे गेल्यानंतर आपल्या बोटात अंगठी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ घरी जाऊन घडलेला प्रकार मुलाला सांगितला. मुलाने भांडुप पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.