मुंबई : देशातील सर्वात मोठे प्रस्तावित वाढवण बंदर समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी वाढवण ते इगतपुरी (समृद्धी) द्रुतगती महामार्ग हाती घेण्यात आला आहे. त्यातील तवा (चारोटी) ते इगतपुरी ८५.३८ किमीच्या मार्गाची बांधणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) केली जाणार आहे. मात्र आता हा महामार्ग इगतपुरीऐवजी भरवीरपर्यंत नेण्यात येणार आहे. एमएसआरडीसीकडून तवा ते इगतपुरी महामार्गाच्या संरेखनात बदल करण्यात आला असून आता हा महामार्ग वाढवण ते भरवीरपर्यंत नेण्यात आला आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने तवा ते भरवीर महामार्गाचे संरेखन अंतिम केले असून हा महामार्ग १०४ किमीचा असणार आहे. तर संरेखनासंबंधीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी १५ दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

पालघरमधील वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर विकसित केले जाणार आहे. तेव्हा राज्यातील अधिकाधिक जिल्ह्यातून या बंदरापर्यंत पोहचणे सोपे व्हावे यासाठी ते समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयानुसार वाढवण ते इगतपुरी द्रुतगती महामार्ग प्रस्तावित करण्यात आला. अंदाजे १२५ किमीचा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला, त्यातील अंदाजे तवा (चारोटी) ते इगतपुरी अशा ८५.३८ किमीचा महामार्ग बांधण्याची जबाबदारी एमएसआरडीसीवर टाकण्यात आली. वाढवण ते तवा (चारोटी) महामार्ग बांधण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचएआय) देण्यात आली. त्यानुसार एमएसआरडीसीने तवा ते इगतपुरी महामार्ग बांधण्यासाठी कार्यवाही करत नुकतेच महामार्गाचे संरेखन अंतिम केले आहे. मात्र त्यावेळी महामार्गाच्या संरेखनात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता तवा (चारोटी) ते इगतपुरीऐवजी हा महामार्ग तवा (चारोटी) ते भरवीर असा असेल. हा महामार्ग १०४ किमीचा असून संरेखनाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी १५ दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

तवा ते भरवीर असा १०४ किमीच्या या संरेखनास सरकारची मान्यता मिळाल्यानंतर भूसंपादनासह इतर प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. दरम्यान या महामार्गासाठी १४ हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पासाठीचा निधी उभा करण्याचे आव्हान एमएसआरडीसीसमोर आहे. त्यामुळे हा प्रकल्प बांधा-वापरा-हस्तांतरीत करा वा इतर कोणत्या प्रारुपानुसार करता येईल का यादृष्टीने अभ्यास सुरु असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.