मुंबई : वाढवण बंदर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षांत थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पासाठी भूसंपादनाला २ हजार ५२८ कोटींच्या प्रस्तावासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडच्या माध्यमातून उभारले जात आहे. वाढवण बंदराच्या माध्यमातून जलमार्गे होणारी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक देशातील सर्व भागापर्यंत वेगाने व किफायतशीर किमतीमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने हे बंदर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी वाढवण बंदराला थेट मराठवाडा, विदर्भाशी जोडण्यासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपये खर्चाचा आणि १०५ किलोमीटर लांबीचा सहा पदरी शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गावरून वाढवण बंदराकडे जाण्याकरिता भरवीर-आमणे (समृद्धी महामार्ग) ते बडोदा-मुंबई द्रुतगती मार्गावरून जावे लागते. हे अंतर कमी करण्यासाठी नवा मार्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सागरमाला प्रकल्पांतर्गत सध्या वाढवण बंदर ते मुंबई-सुरत राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील तवापर्यंत ३२ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम हाती घेतले आहे.
वेळेत बचत
या नव्या महामार्गामुळे ७८ किलोमीटर लांबीचा प्रवास टळणार आहे. वाढवण बंदर ते भरवीर हा प्रवास सध्याच्या ४-५ तासांवरून साधारणत: १ ते १.५ तासावर येईल. या प्रकल्पाकरिता भूसंपादनासाठी हुडकोकडून १ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या कर्जासह २ हजार ५२८ कोटी ९० लाख रुपयांच्या तरतुदीसदेखील मंत्रिमंडळाने मान्यता दिली. हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांतून जाणार आहे.