मुंबई : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी छापे टाकले. मुंबई, नाशिक, वसई-विरार येथील ही ठिकाणे असून नाशिकमधील छाप्यात एक कोटी २० लाख रुपये आढळून आले आहेत. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अनधिकृत बांधकामांप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.

वसई-विरार महापालिकेत संघटीतरित्या भ्रष्टाचार सुरू असल्याची माहिती ईडीच्या हाती लागली होती. अनधिकृत बांधकामांसाठी २० ते ३५ रुपये प्रति फूट रक्कम घेतली जात असल्याचा आरोप आहे. याबाबत अधिक माहिती व पुरावे मिळवण्यासाठी ईडीने मंगळवारी वसई-विरार, मुंबई व नाशिक येथील १२ ठिकाणी छापे टाकले. त्यातील बहुसंख्य ठिकाणे पवार किंवा त्यांच्या नातलगांशी संबंधित आहेत. नाशिकमध्ये सापडलेली रक्कम कोणाची आहे, त्याचा स्रोत काय, याबाबत तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत छाप्याची कारवाई सुरू होती. यापूर्वीही ईडीने याप्रकरणी १३ ठिकाणी छापे टाकून नऊ कोटी रुपये रोख रक्कम आणि २३ कोटी रुपये किंमतीच्या हिरेजडित दागिन्यांसह सोने आणि चांदी, तसेच मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त केले होते.

वादग्रस्त कारकिर्द

अनिल पवार यांनी वसई-विवार महापालिकेत सर्वाधिक, तीन वर्षांहून अधिक काळ काढला. या काळात शहरात अंधाधुंद कारभार सुरू असल्याचा आरोप झाला. रस्ते, बांधकाम, पाणी पुरवठा, औषध खरेदी, चुकीच्या पद्धतीने ठेके देणे अशा विविध मार्गाने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वराज्य अभियान संघटनेचे अध्यक्ष धनंजय गावडे यांनी केला आहे. नगररचानकार वाय. एस. रेड्डी यांच्याबरोबर पवार यांच्याही नावे तक्रार करण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात बदली झाल्यानंतरही पवार आठवडाभर पालिकेतच होते. या काळात त्यांनी अनेक फायलींवर सह्या केल्याची तक्रार आहे.