काँग्रेसच्या नेतृत्वात देशभरातील विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली. या आघाडीची बंगळुरूनंतर मुंबईतही बैठक झाली. मात्र, त्यात वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीत सहभागी होण्याबाबत निमंत्रणच मिळालं नसल्याचा आरोप केला. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे कुठल्यातरी वेगळ्याच दुनियेत जगत असावेत किंवा त्यांना सध्याच्या राजकीय घडामोडींची माहिती मिळत नसावी अशा पद्धतीची ते विधानं करत आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा जाहिररीत्या सांगितलं आहे की, वंचित बहुजन आघाडी ‘इंडिया’ आघाडीचा भाग होऊ इच्छिते. तशी वंचितची तयारी आहे. याचा अनेकदा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. मात्र, विजय वडेट्टीवार यांना याबाबत काहीच माहिती कशी नाही याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटते.”

“काँग्रेसने एकदाचं जाहीर करावं की ते आंबेडकरवादाच्या विरोधात आहेत”

“काँग्रेसने एकदाचं जाहीर तरी करून टाकावं की, ते आंबेडकरवादाच्या विरोधात आहेत, आंबेडकरवाद्यांच्या विरोधात आहेत. त्यांना वंचित बहुजनांचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर हे चालत नाही हे त्यांनी एकदाच जाहीर तरी करावं,” असं म्हणत सिद्धार्थ मोकळे यांनी काँग्रेसला घेरलं.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे हे आमचे वकील, त्यांनी आमची…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत

“‘इंडिया’च्या बैठकीत सामील सगळेच पक्ष निमंत्रणाशिवाय सहभागी”

“ज्या धार्मिक विधींचा एकेकाळी वंचित बहुजनांना अधिकार नव्हता, त्या धार्मिक विधीबरोबर इंडिया आघाडीची तुलना करून विजय वडेट्टीवार नेमकं काय सांगू पाहत आहेत ते आम्हाला कळत नाही. मात्र, एक मात्र झालं की, विजय वडेट्टीवार यांच्या विधानामुळे आम्हाला हे कळालं की इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील झालेले सगळेच पक्ष हे निमंत्रणाशिवायच सहभागी झाले होते”, असं म्हणत मोकळे यांनी टोला लगावला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vba criticize congress vijay wadettiwar mention prakash ambedkar inida alliance pbs