सुशांत मोरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेग ताशी १२० किमीपेक्षाही अधिक, चार महिन्यांत ३१५२ वाहनांवर कारवाई

वाढत्या अपघातांमुळे चर्चेत राहणाऱ्या मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावरील बेदरकार वाहनचालकांच्या वेगवेडाला वेसण लागलेली नाही. या मार्गावरील वेगमर्यादा चार-पाच महिन्यांपूर्वी ताशी ८० वरून १२० करण्यात आली. मात्र तीही वाहनचालकांनी ओलांडली असून जानेवारी ते एप्रिलदरम्यान अशा ३१५२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आहे.

बेदरकार वाहन चालवून वेगमर्यादेचा भंग करणे, मार्गिकेची शिस्त मोडणे, ओव्हरटेक करणे अशा प्रकारांमुळे २०१७ पासून द्रुतगती मार्गावर ८४२ अपघातांत २४९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर प्राणहानी होऊनही या मार्गाचा वापर करताना वाहनचालक वेगाच्या आहारी जातात.  या मार्गावरील अनेक वाहनचालक वेगमर्यादेचा भंग करतात. ताशी ८० किलोमीटर असलेली वेगमर्यादा चार-पाच महिन्यांपूर्वी शिथिल करून ती ताशी १२० करण्यात आली; परंतु हा वेगही चालकांना कमी वाटत असल्याचेच त्यांच्यावरील कारवाईच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

जानेवारी ते एप्रिल या कालावधीत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या ३१५२ चालकांवर कारवाई करण्यात आली. याच चार महिन्यांच्या कालावधीत २०१८ मध्ये ११९० चालकांवर कारवाई करण्यात आली होती. बेदरकार वाहनचालकांकडून २०१८ मध्ये ११ लाख ७२ हजार १०० रुपये, तर २०१९ मध्ये ३१ लाख ९५ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

स्पीड कॅमेऱ्यांची प्रतीक्षा

द्रुतगती मार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर स्पीड गन कॅमेरा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. स्पीड गन बसवून दोन वर्षे उलटली, तर तीन महिन्यांपूर्वी कॅमेरे बसवण्यात आले. मात्र संपूर्ण मार्गावर एकच स्पीड कॅमेरा प्रायोगिक तत्त्वावर बसवला असून त्याद्वारेच बेदरकार वाहनचालकांवर कारवाई होत आहे. या मार्गावर ३२ ठिकाणी १०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, परंतु त्यांची प्रतीक्षा केव्हा संपणार, असा प्रश्न आहे.

द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादा ताशी १२० किमी एवढी आहे. तीही वाहनचालक ओलांडत आहेत. त्यामुळे पुन्हा ताशी ८० किमी वेगमर्यादा करण्यावर विचार सुरू आहे.

– विजय पाटील, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस (मुख्यालय)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicles speed on mumbai pune expressway