मुंबई : ‘पिंजरा’, ‘ झनक झनक पायल बाजे’, ‘ दो आँखें बारह हाथ’सारख्या चित्रपटातून उत्तम अभिनय आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर लोकप्रिय झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी व्ही. शांताराम यांचे चिरंजीव किरण शांताराम, त्यांची मुले आणि परिवारातील मोजके सदस्य उपस्थित होते.
अभिनेत्री संध्या यांनी चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतला होता. गेली अनेक वर्षे त्या आजारी होत्या. त्यांचे मूळ नाव विजया देशमुख. त्यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बाबुराव पेंढारकर यांच्या ललितकलादर्श कंपनीत कामाला होते. संध्या यांची मोठी बहीण वत्सला देशमुख याही हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून नावाजलेल्या होत्या. चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्यामुळे संध्या यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. १९५१ साली प्रदर्शित झालेल्या ‘अमर भूपाळी’ या मराठी चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले.
त्यानंतर त्यांनी व्ही . शांताराम यांच्याच ‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटात काम केले. संध्या यांनी नृत्याचे प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र, ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी प्रसिद्ध कथक नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक गोपी कृष्ण यांच्याकडून कथक नृत्याचे धडे घेतले. ‘झनक झनक पायल बाजे’ हा चित्रपट आणि संध्या यांची भूमिका दोन्हीला प्रेक्षकांची दाद मिळाली. पुढे ‘नवरंग’ या चित्रपटातही संध्या यांच्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले. संध्या यांना खरी ओळख मिळाली ती ‘पिंजरा’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे. या चित्रपटातील गाणी आणि संध्या यांच्यावर चित्रित झालेली नृत्यही लोकप्रिय ठरले. १९७५ साली प्रदर्शित झालेला ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. मोजक्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात अजरामर झालेल्या अभिनेत्री हिच संध्या यांची खरी ओळख ठरली.