मुंबई: आर्थिक फसवणुकीसाठी सायबर भामटे वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. प्रथमच ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. भारतातील आरोपींनी चिनी सायबर भामट्यांच्या मदतीने प्रसिद्ध शेअर बाजार विश्लेषकाची ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाच्या आधारे चित्रफित तयार केली होती. ही चित्रफित खरी असल्याचे भासवून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्यात येत होती. यासाठी आरोपींना चीनी सायबर भामट्यांकडून ३ कोटी रुपये मिळाले होते.

फिर्यादी हे सेबीचे नोंदणीकृत विश्लेषक असून शेअर बाजार तज्ञ (स्टॉक मार्केट एक्सपर्ट) म्हणून काम करतात. ते वेगवेगळया अर्थवृत्त वाहिन्यांवर वायदे बाजारातील गुंतवणूकीबाबत मार्गदर्शन करून सल्ले देत असतात. २९ सप्टेंबर रोजी समाजमाध्यमावर त्यांची एक चित्रफीत प्रसारित झाली. त्यात ते संभागांची खरेदी विक्री, गुंतवणूक यासंदर्भात माहिती देत असल्याचे दाखविण्यात आले होते.

‘डिफ फेक’ तंत्रज्ञानाचा वापर

ही चित्रफीत पाहून फिर्यादी यांना धक्का बसला. ही चित्रफित अगदी हुबेहूब वाटत असली तरी पूर्ण बनावट होती. गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी ‘डिप फेक’ तंत्रज्ञानाचा वापर करून ती तयार करण्यात आली होती. नामांकित शेअर बाजार तज्ञ सल्ला देत आहेत असा गुंतवणूकदारांचा समज झाला होता. याबाबत फिर्यादीने पश्चिम सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांनी फेसबुककडून माहिती मागवून तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू केला. याप्रकरणी जिजिल सॅबेस्टियन (४४), दिपायन बॅनर्जी (३०) डेनियल आरुमुघम, (२५) या ३ आरोपींना कर्नाटक मधून तर चंद्रशेखर नाईक (४२) या आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.

चिनी कंपनीकडून ३ कोटी घेतले

आरोपी हे एका उच्चपदस्थ कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यांनी चिनी सायबर भामट्यांना फेसबुक खात्याचा वापरण्याचे अधिकार(एक्सेस) दिला होता. त्याबदल्यात साधारण ३ कोटी भारतीय व दुबई चलनाच्या माध्यमातुन घेतल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पश्चिम सायबर पोलिसांनी दिली. त्यांनी अनेक तज्ञ, निवेदक यांचे डीप फेक चित्रफीत तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काय आहे डीप फेक तंत्रज्ञान?

‘डीप फेक’ म्हणजे खोटं पण खरं वाटेल असं डिजिटल चित्रण. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने तयार केलेले एक प्रगत डिजिटल तंत्र आहे. यात एखाद्या व्यक्तीचा चेहरा, आवाज किंवा देहबोली दुसऱ्या व्यक्तीच्या जागी अत्यंत वास्तवदर्शीपणे बसवता येते. म्हणजे खोट्या पण खऱ्यासारखं वाटणाऱ्या चित्रफीती तयार केल्या जातात. प्रसिध्द व्यक्तीच्या नावाने बदनामी करण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी डिप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जातो.