|| मानसी जोशी

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांनी राज्यातील विविध मतदारसंघातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अभिजीत बिचुकले, दीपाली सय्यद आणि गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून गायक आनंद शिंदे यांना मात्र उमदेवारी मिळालेली नाही.

राजकारण आणि कलाकार यांचे नाते अतूट आहे. अनेक वर्षांपासून लोकसभा आणि विभानसभा निवडणुकीत विविध अभिनेते, कलाकार आणि गायकांनी राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. प्रेक्षकांमधील असणारी लोकप्रियता लक्षात घेऊन अनेक पक्षांनी या चेहऱ्यांना तिकीट दिले आहे. यंदा राज्यातील विधानसभा निवडणुकीत तीन कलाकार निवडणूक लढवणार आहेत. ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रसिद्ध झालेले क लाकार अभिजीत बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून अपक्ष म्हणून आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून ठाकरे घराण्यातून प्रथमच निवडणूक लढवणारे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे. विविध मराठी चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शिवसेनेकडून कळवा-मुंब्रा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यंदा कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विरुद्ध शिवसेनेच्या दीपाली सय्यद असा सामना रंगणार असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. यापूर्वी त्यांनी २०१४च्या लोकसभेत अहमदनगरमधून आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवली होती.

‘धुमस’ या चित्रपटातून पदार्पण करणारे अभिनेते गोपीचंद पडळकर बारामतीमधून अजित पवारांविरुद्ध उभे ठाकले आहेत. वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकल्यावर पडळकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कळवा आणि मुंब्रा या परिसरात रस्ते, वाहतूक, अनधिकृत बांधकामे या अनेक समस्या आहेत. या निमित्ताने या परिसरात नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा मानस आहे. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा कशा मिळतील याकडे जास्त लक्ष देण्यात येईल. – दीपाली सय्यद, उमेदवार, कळवा-मुंब्रा मतदारसंघ

(कळते समजते.. मेहनत वाया गेली)

भाजप आणि शिवसेना युतीबद्दलची अनिश्चितता लक्षात घेऊनच भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला होता. मतदारसंघांमध्ये दौरे सुरू केले होते. ‘आमचं ठरलंय’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सतत सांगत होते तरीही काही तरी बिघडेल, असा इच्छुकांना आशावाद होता. शेवटी युतीचे जमले. युती कायम राहिल्याने भाजप किंवा शिवसेनेतील इच्छुकांचा हिरमोड झाला. गेली पाच वर्षे राज्यसभा किंवा विधान परिषद कोणतीही निवडणूक असो, सत्ताधारी भाजपमध्ये दोन नावांची कायमच चर्चा व्हायची. एक शायना एन सी आणि दुसरे माधव भांडारी. भांडारी यांना सरकारी महामंडळाचे अध्यक्षपद तरी मिळाले. पण पेशाने फॅशन डिझायनर असलेल्या शायना यांना कोणतेच पद मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळावी या उद्देशानेच शायना एन सी यांनी  भायखळा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. भायखळ्यात गल्लोगल्ली भेटीगाठी सुरू केल्या. या भेटींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करू लागल्या. शायना या निवडणूक लढविण्याच्या तयारीत असतानाच युतीचे जमले आणि भायखळा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला गेला. शायना यांची मेहनत वाया गेली. लोकसभा आणि विधानसभा नाही, खासदारकी किंवा आमदारकीसाठी पुन्हा प्रतीक्षाच शायना यांच्या नशिबी आली.         – संतोष प्रधान