Viral Video Mumbai Metro Train : मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारावी, मुंबईकरांचा प्रवासातील वेळ कमी व्हावा याकरता मुंबईतील मेट्रोचं जाळं विस्तारलं जात आहे. या मुंबई मेट्रोला मुंबईकरांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. दरम्यान, सरकारी सेवेचा लाभ घेताना आपण काही नागरी नियम पाळायला हवेत, याचं भानही नागरिकांना राहत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मुंबई मेट्रोतील एका स्थानकातील एक अत्यंत किळसवाणा व्हिडिओ समोर आला आहे. या वर अनेक मुंबईकरांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
क्लिक सेन्स या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मेट्रोच्या कोणत्या स्थानकाचा आहे हे स्पष्ट होऊ शकले नसले तरीही कॅप्शनच्या हॅशटॅगमध्ये माहिमचा उल्लेख आहे. तसंच, व्हिडिओवरील कॅप्शनमध्ये नॉट इव्हन अ विक असं लिहिलेलं आहे. म्हणजेच हे स्थानक कार्यान्वित होऊन एक आठवडाही झाला नसल्याचं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. म्हणजेच, नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रो ३ च्या टप्पा २ अ मार्गिकेवरील शीतला देवी मंदिर स्थानकातील हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे.
या व्हिडिओमध्ये काय आहे?

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

सार्वजनिक मालमत्ता वा सार्वजनिक जागेवर स्वच्छता ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. अस्वच्छता पसरवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईही केली जाते. मात्र, तरीही अनेक नागरिकांकडून रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी पान-गुटखा खाऊन पिचकारी मारली जाते. यामुळे परिसर अस्वच्छ दिसतो. असाच प्रकार नव्याने सुरू झालेल्या या मेट्रो स्थानकावर दिसून आला आहे. मेट्रो स्थानकाच्या एका कोपऱ्यात पान गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्याचं स्पष्टपणे दिसतंय. हेच या व्हिडिओतून दिसतंय.

मुंबईकरांचा संताप

हे अत्यंत किळसवाणं दृष्य पाहून अनेक मुंबईकरांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. परप्रांतीयांनी येऊन येथे घाण केल्याचंही काहींनी म्हटलंय तर काहींनी म्हटलंय की अशी घाण आणि दुर्गंधी पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करायला हवी. तसंच, मुंबईकर अशी घाण करणार नाहीत, मुंबईच्या बाहेरून येणाऱ्यांकडूनच घाण केली जाते, असंही काही नेटीझन्सने या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of mumbai metro train 3 phase 2 spitting pan gutkha mumbaikar reacts sgk