मुंबई : टी २० क्रिकेट विश्वचषक- २०२४ विजेत्या भारतीय संघाचा स्वागत सोहळा आटोपून गर्दी ओसरल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांनी गुरुवारी रात्रभर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण मरिन ड्राईव्ह परिसर स्वच्छ केला. खाद्यपदार्थांचे वेष्टन (रॅपर्स), पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, बूट, चप्पल आणि इतर वस्तू असा तब्बल दोन मोठे डंपर आणि पाच लहान जीप भरून अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मरिन ड्राईव्ह परिसरात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्वागत सोहळा आटोपल्यानंतर रात्री उशीरा गर्दी ओसरली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने संपूर्ण मरिन ड्राईव्ह परिसरात रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबविली. मरिन ड्राईव्ह परिसरात दररोज सकाळी नित्यनेमाने चालण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होवू नये म्हणून हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

हेही वाचा : कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू, प्रवेशासाठी १७ हजार ९२६ जागा उपलब्ध

मरिन ड्राईव्ह परिसरात दररोज सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मरीन ड्राइव्ह परिसरात ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण रात्रभर मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अथकपणे स्वच्छता मोहीम राबवली. रात्री उशिरापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी थांबलेली गर्दी ओसरू लागताच तातडीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या देखरेखीखाली या संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्यात आली.

‘ए’ विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे १०० कामगारांनी, स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने केलेल्या या कार्यवाहीत एक कॉम्पॅक्टर आणि एक डंपर कचरा संकलित झाला. त्यासोबतच छोट्या पाच जीप भरून कचरा संकलन करण्यात आले. रात्री सुमारे ११.३० पासून सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम सकाळी ८ वाजेपर्यंत निरंतर सुरू होती. त्यामुळे मॉर्निंक वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना स्वच्छ मरिन ड्राईव्ह उपलब्ध झाला.

हेही वाचा : मुंबई: क्षय रुग्णसेवेत पालिकेचाच खोडा, २४ सक्षम क्षयरोग साथींना काम सोडण्याचे आदेश

या स्वच्छता मोहिमेत खाद्यपदार्थांचे वेष्टन (रॅपर्स), पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, बूट, चप्पल आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या. या संकलित कचऱ्यापैकी सुमारे ५ जीप भरून संकलित बूट, चप्पल व इतर पुनर्प्रक्रिया योग्य वस्तू क्षेपणभूमीवर न पाठवता त्या पुनर्प्रक्रियेसाठी देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water bottles shoes plastic bags garbage on marine drive after team india victory parade mumbai print news css