मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस येथे तोतया पोलिसांनी एका व्यापाऱ्याचे १० लाख ३० हजार रुपये लाटण्याची घटना घडली. परंतु, या तोतया पोलिसांच्या पडद्याआड खरे रेल्वे पोलीस कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. तोतयाला हाताशी घेऊन प्रवाशाला लुटण्याचा प्रकार १ सप्टेंबर रोजी घडला.
या घटनेनंतर, मंगळवारी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि मंगळवारी रात्रीपर्यंत आरोपी निलेश कळसुलकर (४५) आणि प्रवीण शुक्ला (३२) यांना अटक केली. तर, बुधवारी वांद्रे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) विजया इंगवले हिलाही अटक करण्यात आली.
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यातील तीन रेल्वे पोलिसांवर व्यापाऱ्यांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण उजेडात असताना, वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यातील महिला रेल्वे पोलीस अधिकारी आणि दोन व्यक्तीना हाताशी घेऊन व्यापाऱ्यांची लूट करीत असल्याचा प्रकार घडला.मालाड येथील रहिवासी विकास गुप्ता हे कपड्याचे व्यावसायिक आहेत. कपड्यांची खरेदी करण्यासाठी ते गुजरातला रवाना होत होते. यावेळी गुजरातला जाणारी रेल्वेगाडी पकडण्यासाठी ते वांद्रे टर्मिनस येथे आले. वांद्रे टर्मिनस येथील रेल्वे उपाहारगृहाजवळ उभे राहिले होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी पोलीस असल्याचे सांगून, कुठे जात आहेत, बॅगेत काय आहे, अशी विचारणा केली.
अनोळखी व्यक्तींनी बॅगेची पाहणी केली असता, त्यात रोख रक्कम असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी याबाबत गुप्ता यांच्याकडे विचारणा केली. तसेच रोख रक्कम गुप्ता यांचीच आहे, त्याचा पुरावा दाखविण्यास सांगितले. परंतु, त्यावेळी कोणताही पुरावा नसल्याने गुप्ता घाबरून गेले. अनोळखी व्यक्तींनी रोख रक्कम घेऊन पुन्हा मिळणार नसल्याचे सांगितले. काही वेळानंतर गुप्ता यांना आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी १० लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात नोंदवली.
रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. मंगळवारी आरोपी निलेश कळसुलकर (४५) आणि प्रवीण शुक्ला (३२) यांना अटक केली. तर, आरोपी महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) विजया इंगवले हिला बुधवारी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मंगळवारी रात्रीपर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तर, बुधवारी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) हिला अटक केली आहे. पश्चिम रेल्वेच्या खार रोड रेल्वे स्थानक, वांद्रे टर्मिनसवरून महिला पोलिस अधिकारी बॅग घेऊन जाताना सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसली होती. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने दिली.