मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) इ-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक केली. आरोपी ॲशले चेट्टियार (४३) असे त्याचे नाव आहे. त्यांच्याकडून २६ हजार रुपयांची इ-तिकीट जप्त केली.

दिवाळीनिमित्त रेल्वेने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्या तुलनेत रेल्वेगाड्या कमी असतात. त्यामुळे आरक्षित तिकिटे मिळत नाही. आरक्षित तिकिटे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक दलाल रेल्वे परिसरात फिरतात. तर, अनेक जण ऑनलाइन तिकिटांचा काळाबाजार करतात. पश्चिम रेल्वेच्या भाईंदर आरपीएफने तिकिटांच्या काळाबाजार रोखण्यासाठी मोहीम आखली आहे. तसेच सायबर सेलद्वारे विविध माहितीच्या आधारे आरपीएफ पथक छापे टाकत आहे. नुकताच मीरा रोड येथे छापा टाकून चेट्टियार याला अटक करण्यात आली. चेट्टियार हा आयआरसीटीसीचा अधिकृत दलाल नसल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे रेल्वे कायदयाच्या तरतुदींचे उल्लंघन करून रेल्वे इ-तिकीटांच्या अनधिकृत विक्रीमध्ये सक्रियपणे सहभाग होता.

आरपीएफने छाप्यादरम्यानअनेक वस्तू जप्त केल्या. जप्त केलेल्या वस्तूंपैकी एक जुना मोबाइल अनधिकृत व्यवहारांसाठी वापरला जात असल्याचा संशय होता. आयआरसीटीसी इ-तिकीटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्यूआर कोडचे स्क्रीनशॉट देखील आढळले. याव्यतिरिक्त, एक ए-४ शीट पुनर्प्राप्त करण्यात आली. त्यामध्ये तिकीट आरक्षणाबाबत तपशीलवार माहिती होती. दोन वैयक्तिक आयआरसीटीसी वापरकर्ता आयडी आढळून आले. हे काळाबाजार करण्यासाठी वापरले जात होते. आरपीएफ पथकाने १०,०१३ रुपयांची एक इ-तिकीटे जप्त केली. तसेच १६,२९० रुपयांची वापरलेली सहा इ-तिकिटे छाप्यादरम्यान सापडली. वसूल केलेल्या एकूण तिकिटांचे मूल्य २६,३०३ रुपये होते.

पश्चिम रेल्वेद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, चेट्टियार वैयक्तिक वापरकर्ता आयडी वापरून रेल्वे ई-तिकीट आरक्षित करीत असल्याचे आढळून आले. तो प्रति प्रवासी ५० ते १०० रुपये या दराने प्रवाशांना तिकीट विकत होता. चेट्टियारविरोधात भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासांनी कोणत्याही दलालांकडून तिकीट खरेदी करू नये. अशा तिकीटावर रेल्वे प्रवास करता येऊ शकत नाही, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.