मुंबई : समुद्राला भरती आलेली असताना मुसळधार पाऊस पडल्यास सखलभाग जलमय होतात, रेल्वे मार्गावर पाणी साचते आणि लोकल सेवा खोळंबते. यंदा पश्चिम रेल्वेने पावसाळ्यात रेल्वे मार्गावर पाणी साचू नये यासाठी पाणी उपसणाऱ्या पंपाची व्यवस्था, रेल्वे रूळाची सफाई, मायक्रो-टनेलिंग पद्धतीने सात पर्जन्य वाहिन्या तयार केल्या आहेत. तसेच मुसळधार पावसात भुयारी गटारांची सातत्याने पाहणी करण्यासाठी ‘रिमोट कंट्रोल्ड व्हिज्युअल फ्लोट कॅमेरे’ सज्ज केले आहेत. रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा भुयारी गटारात जाऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी ‘रिमोट कंट्रोल्ड व्हिज्युअल फ्लोट कॅमेऱ्या’चा वापर करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री

पावसाचा जोर वाढल्यास पश्चिम रेल्वेवरील ग्रँट रोड, प्रभादेवी, दादर, माटुंगा रोड, माहीम यार्ड, वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी आणि वसई-विरार या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे या ठिकाणी भुयारी गटारे, नालेसफाईची कामे वेगात करण्यात आली आहेत. बोरिवली – विरार विभागात पावसाळापूर्व कामाचा ड्रोनने आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात भुयारी गटारांत जाणे रेल्वे कर्मचाऱ्यांना शक्य नसते. त्यामुळे भुयारी गटारांची पाहणी करण्यासाठी ‘रिमोट कंट्रोल्ड व्हिज्युअल फ्लोट कॅमेऱ्या’चा वापर करण्यात येणार आहे. हा कॅमेरा छोटेखानी बोटीवरून भुयारी गटारांतील प्रत्येक बाबीची अद्ययावत माहिती गोळा करून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना देईल. रेल्वे अधिकारी या कॅमेऱ्याला रिमोटद्वारे नियंत्रित करून आवश्यक तिथे फिरवू शकतात. तसेच भुयारी गटारांमध्ये काही समस्या असल्यास, पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याचे आढळल्यास पुढील उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा : घरे देण्याचे आमिष दाखवून ६० महिलांची फसवणूक; सुमारे अडीच कोटींच्या फसवणुकीप्रकरणी दोन भावांविरोधात गुन्हा दाखल

पश्चिम रेल्वेकडे सध्या ३० ‘रिमोट कंट्रोल्ड व्हिज्युअल फ्लोट कॅमेरे’ असून या कॅमेऱ्यांची किमत ३ लाख रुपये आहे. हे कॅमेरे कुठल्याही निश्चित ठिकाणी ठेवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा वापर कुठेही कधीही करता येऊ शकतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway remote controlled visual float camera will inspect subway drains mumbai print news css