मुंबई: हवेच्या वरच्या स्थरात असलेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती आणि उत्तरेत थंडीच्या लाटांसह थंड हवेचे झोत येण्याची शक्यता नसल्यामुळे राज्यासह देशभरात फेब्रुवारी महिन्याच्या उर्वरीत दिवसांमध्ये उन्हाच्या झळांची तीव्रता वाढणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतात सोमवारपासून (१६ फेब्रुवारी) हवेच्या वरच्या स्थरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तरेत असलेले थंड वारे राज्यापर्यंत येणार नाहीत. शिवाय उत्तर भारतात पुढील आठवडाभरात थंड हवेचे झोत अथवा थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे उत्तरेतून राज्यात थंड हवा येण्याची शक्यता मावळली आहे. परिणामी उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भासह राज्याच्या बहुतेक भागात तापमान वाढ झालेली दिसून येत आहे. त्यात भर म्हणून बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत असल्यामुळे राज्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. सोमवारपासून (१६ फेब्रुवारी) पुढील चार दिवस तापमानात आणखी एक – दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची चिन्हे आहेत.

उत्तरेत थंड हवेचे झोत म्हणजेच पश्चिमी थंड वारे येण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे उत्तरेतही पहाटेच्या तापमानात वाढ होऊन तापमान स्थिर झाले आहे. पुढील चार – पाच दिवसांत उत्तरेही कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या अखेरीपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होऊन उन्हाळ्याची चाहूल लागेल, असा अंदाज आहे.

उन्हाळ्याची चाहूल

राज्यातील सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअवर गेले आहे. पुढील चार दिवस कमाल – किमान तापमानात आणखी एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी अखेरपासून तापमान वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल लागेल, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सानप यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the reasons for the increase in the intensity of heat waves mumbai print news amy