नियमबाह्य, गैरवर्तन करणाऱ्या टॅक्सी, रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत रिक्षा, टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणे, प्रवाशांशी गैरवर्तन करणे, अधिक भाडे आकारणे असे प्रकार सर्रास घडतात. तसेच प्रवाशांकडून अॅप आधारित कॅब चालकांबाबतच्या तक्रारीही असंख्य आहेत. त्यावर उपाय म्हणून आता मुंबई महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) एकच व्हाॅट्सअॅप मदत क्रमांक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता एमएमआरमधील प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी आणि अॅप आधारित कॅबमुळे गैरसोय झाल्यास थेट व्हाॅट्सअॅपवर तक्रार करता येईल. त्यानंतर संबंधित चालकाविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत बहुसंख्य रिक्षा-टॅक्सी चालकांचा मनमानी कारभार सुरू असतो. रिक्षा, टॅक्सी थांबा नसलेल्या ठिकाणी वाहने उभी केली जातात. प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जाते, जवळचे भाडे नाकारले जाते, प्रवाशांशी गैरवर्तन करणे… अशा घटना सातत्याने घडतात. तसेच वाहतुकीचे नियम मोडून रिक्षा-टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरून चालवल्या जातात.

वेगात वाहन चालवणे, वाहनांचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र नसणे, ॲपवरून मागणी केलेली वाहने वेळेत न येणे, वाहनातील अस्वच्छता, सण-उत्सवाच्यावेळी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे अशा प्रकारांनी प्रवासीही त्रासले आहेत. मात्र परिवहन विभाग आणि प्रवासी यांचा थेट संबंध येत नाही. त्यामुळे तक्रार कुठे आणि कशी करायची याबाबत प्रवासी अनभिज्ञ असतात.

मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी, बोरिवली आरटीओने तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक आणि ई-मेल आयडी दिले आहेत. परंतु, चार आरटीओचे चार क्रमांक असल्याने, नेमकी तक्रार करायची कुठे असा प्रश्न प्रवाशांना पडतो. त्यामुळे एमएमआरमधील प्रवाशांच्या तक्रारीसाठी एकच व्हॉट्सॲप क्रमांक तयार करण्यात येणार आहे. प्रवाशांना त्यांची तक्रार व्हॉट्सअॅपवर नोंदवता येईल, असे सरनाईक यांनी सांगितले.

वांद्रे पूर्व मतदार संघातील वांद्रे, खार व इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांची अरेरावी सुरू आहे. हे चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात. गैरवर्तन करतात, तसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केली होती. त्यानंतर वरुण सरदेसाई आणि मोटार परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासह प्रताप सरनाईक यांनी बैठक घेऊन प्रवाशांना व्हॉट्सअॅप तक्रार क्रमांक देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

परिवहन विभागाला सूचना सरनाईक म्हणाले, मोटार परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक नेमावे. ज्या भागात अशाप्रकारे प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी चालकांकडून त्रास होतो. तेथे वारंवार गस्त घालावी. सध्या अंधेरी प्रादेशिक विभागासाठी ९९२०२४०२०२ हा व्हाॅट्सअॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

मात्र प्रादेशिक विभाग निहाय व्हॉट्सॲप क्रमांकाएेवजी पूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी एकच व्हाॅट्सअॅप क्रमांक या आठवड्यात जाहीर करावा त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. जेणेकरून प्रवासी आपल्या तक्रारी संबंधित व्हॉॅट्सॲप क्रमांकावर करतील. तक्रार असलेल्या रिक्षा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवणे आवश्यक असून तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन गरज पडल्यास त्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, असे आदेश परिवहन विभागाला सरनाईक यांनी दिले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp number for complaints against errant auto taxi drivers mumbai print news zws