स्पष्टीकरण देण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे भुजबळांना आव्हान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र सदन प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या अहवालाचा चुकीचा अर्थ काढत आपल्याला सरकारने क्लीन चिट दिल्याचे लोकांना सांगण्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांना भलतीच घाई झाल्याचे दिसते. पण त्यांना कोणतीही क्लीनचीट देण्यात आलेली नसून महाराष्ट्र सदनाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणणे गरजेचे असतानाही तो पायाभूत सुविधा समितीसमोर का नेण्यात आला तसेच अहमदनगर-औरंगाबाद रस्त्याच्या रूंदीकरणाच्या टिपणीमध्ये महाराष्ट्र सदनाचा विषय बळजबरीने घुसविण्यात एवढा रस का घेतला हे आधी भुजबळांनी लोकांना सांगावे, असे आव्हान सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिलेल्या अहवालावरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेच्या पाश्र्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना पाटील यांनी भुजबळ यांच्यावरच हल्लाबोल केला. महाराष्ट्र सदन प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही मुद्याबाबत स्पष्टीकरण मागवले होते.

त्यानुसार मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी दिलेल्या खुलाशास शासनाने मान्यता दिली होती. मात्र या अहवालाचा वेगळा अर्थ लावून आपल्याला सरकारने क्लीन चिट दिल्याचे भुजबळ सांगत आहेत. प्रसार माध्यमांमध्येही अशीच चर्चा सुरू झाल्याने त्याची दखल घेत सेवानिवृत्त पोलिस अधिकारी देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करून नव्याने अहवाल पाठविण्यात आला. यावेळी देबडवार आणि अतुल चव्हाण या अधिकाऱ्यांनी पहिल्या अहवालात काही वाक्य अनवधानाने  नमुद केल्याचे लेखी मान्य केल्यावरून त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या असून त्याच्या खुलाशानंतर पुढील कारवाई केली जाईल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मुळातच परिवहन विभागाच्या अंधेरी येथील भूखंडाच्या बदल्यात महाराष्ट्र सदन आणि हायमाऊंट अतिथीगृह बांधण्याचे काम विनानिविदा देताना तो विषय मंत्रिमंडळासमोर यायला हवा होता.

भुजबळ यांनी मात्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा विषय मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत सुविधा समितीसमोर आणण्यासाठी  प्रयत्न का केले. त्याचप्रमाणे नगर -औरंगाबाद रस्त्यांच्या रूंदीकरणाबाबत उद्योजकासोबत वाटाघाटी करणे योग्य होणार नाही अशी टिपणी नियोजन विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविली होती.

त्याच टिपणीमध्ये भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाचा विषय बळजबरीने घुसडला असा गौप्यस्फोट करीत एकूणच या प्रकल्पात भुजबळ यांनी एवढा सर का घेतला याचा खुलासा करावा अशी मागणीही पाटील यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why road winding proposal came into maharashtra sadan