मुंबई : भारतातील शिक्षणात बदल घडवून आणण्यासाठी आणि विद्यार्थिनींमधील नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) या क्षेत्रात शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आयआयटी मुंबईने घेतला आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईने ‘विंग्स’ (वुमन इन्स्पायरिंग ग्रोथ इन स्टेम) ही शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. विद्यार्थिनींच्या या शिष्यवृत्तीसाठी आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी भरत देसाई व त्यांच्या पत्नी निरजा सेठी यांनी पुढाकार घेतला आहे.

आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातील हा पहिलाच उपक्रम आहे. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी या शिष्यवृत्तीअंतर्गत त्यांना संपूर्ण शुल्कमाफी दिली जाणार आहे. देशातील अधिकाधिक तरुणींना जागतिक दर्जाचे स्टेम शिक्षण घेता यावे यादृष्टीकोनातून या शिष्यवृत्तीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागाातील विद्यार्थिनींना आयआयटी मुंबईमध्ये अर्ज करण्यासाठी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.

आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळे नये यासाठी ही शिष्यवृत्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भविष्य घडविणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थिनींना त्यांचे ध्येय पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य या शिष्यवृत्तीमधून मिळणार आहे. त्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात असल्याचे आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी सांगितले.

शिक्षण हे बदलाचे सर्वात शक्तिशाली साधन आहे. आर्थिक अडथळे दूर करून, भारतातील नवोन्मेष आणि प्रगतीचे भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे भरत देसाई यांनी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून आयआयटी मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेत विद्यार्थिनींची उपस्थिती वाढण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.