मुंबई : म्हाडाचे मुंबई मंडळ प्रथमच जलतरण तलाव, क्लब हाऊस आणि पोडीयम वाहनतळ आदी पंचतारांकित सुविधांचा समावेश असलेल्या ३९ मजली (पाच मजली पोडीयमसह) इमारतीची उभारणी करीत आहे. या प्रकल्पातील ३३२ घरांसाठी नुकतीच सोडत काढण्यात आली असून सोडतीमधील विजेत्यांना घराच्या ताब्यासाठी चार ते पाच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबरमध्ये १०० टक्के काम पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. त्यानंतर इमारतीस निवासी दाखला घेऊन विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी फेब्रुवारी – मार्च २०२५ उजाडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोरेगावमधील पहाडी परिसरात मुंबई मंडळाने अंदाजे ८ हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पातील अल्प, अत्यल्प गटांतील २,६८३ घरांचे काम पूर्ण करण्यात आले आणि या घरांसाठी २०२३ मध्येच सोडत काढण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात मध्यम आणि उच्च गटांतील ३३२ घरांचे बांधकाम सुरू आहे. या निर्माणाधीन प्रकल्पातील घरांचा मंडळाने ऑक्टोबर २०२४ च्या सोडतीत समावेश केला होता. सोडतीसाठी पुरेशी घरे नव्हती. म्हणून मंडळाने या घरांचा सोडतीत समावेश केला आणि ३३२ घरांसाठी ८ ऑक्टोबर रोजी सोडत काढली. म्हाडाने गोरेगावसारख्या ठिकाणी पहिल्यांदाच पंचतारांकित इमारतीत उच्च आणि मध्यम गटातील घरे उपलब्ध करून दिल्याने सोडतीत या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने या घरांसाठी अर्ज सादर झाले होते. म्हाडाने पहिल्यांदाच पहाडी येथे ३९ मजली इमारत  बांधली असून प्रथमच पोडीयम वाहनतळ, जलतरण तलाव, योग केंद्र, क्लब हाऊस अशा पंचतारांकित सुविधा उपलब्ध केल्या आहेत. खासगी विकसकाप्रमाणे म्हाडाच्या प्रकल्पात सुविधा मिळत असल्याने आणि परवडणाऱ्या किंमतीत या प्रकल्पात घरे उपलब्ध होत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा >>>मुंबईत रेबीजमुळे कोल्ह्याचा मृत्यू

सोडतीत विजेत्यांचे घराचा ताबा कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. या विजेत्यांना आणखी किमान चार-पाच महिने घरासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर अखेरीस पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. इमारत पूर्ण झाल्यानंतर निवासी दाखला मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. निवासी दाखला मिळण्यासाठी किमान दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवासी दाखला प्राप्त होऊन देकारपत्र वितरीत करून घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२५ उजाडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winners of five star projects in pahari get possession of houses in february march mumbai print news amy