लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई गृहनिर्माण मंडळाने यंदा चार हजार ८२ घरांसाठी काढलेली सोडत पूर्णत: ॲानलाइन होती. आता या विजेत्यांना घरांचा ताबा देतानाही कुठल्याही कर्मचाऱ्याशी वा अधिकाऱ्याशी संबंध येऊ नये, यासाठी मंडळाने घराचा ताबाही ॲानलाइन देण्याची पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीने आतापर्यंत दीडशेहून अधिक विजेत्यांना ताबा देण्यात आला असून दिवाळीत त्यांना गृहप्रवेश करता आला आहे.

घराची संपूर्ण विक्री किंमत, मुद्रांक शुल्क, नोंदणी तसेच देखभाल खर्च भरलेल्या अर्जदारांना ॲानलाइन ताबा पत्र देण्यात येत असल्याचे मुंबई गृहनिर्माण मंडळाचे उप मुख्य अधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. या विजेत्यांना फक्त घराची चावी घेण्यासाठी म्हाडा कार्यालयात यावे लागत असून तेथेही विलंब होऊ नये यासाठी सर्व प्रक्रिया ॲानलाइन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या विजेत्यांना लगेच नव्या घराची चावी मिळत असल्यामुळे त्यांना दिवाळीतच नव्या घरात प्रवेश करणे शक्य झाले आहे.

आणखी वाचा-मुंबई : दिवाळीनिमित्त पनवेल-नांदेड, सीएसएमटी-धुळे विशेष रेल्वेगाड्या

यंदा पहिल्यांदाच नव्या प्रणालीनुसार अर्ज नोंदणी व पात्रता निश्चितीनंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी झाले. मंडळातर्फे सोडतीनंतरही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्याने विजेत्यांना प्रथम सूचना पत्र, तात्पुरते देकार पत्र, २५ टक्के विक्री किमतीचा भरणा करण्याचे पत्र, ७५ टक्के रक्कम गृह कर्जामार्फत उभारण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, वितरण आदेश, ताबा पत्र आदी सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रक्रियेत सर्व पत्रे संबंधित विजेत्यांना अधिकाऱ्याच्या डिजिटल स्वाक्षरीने जात आहेत. यामुळे बनावट, खोटी कागदपत्रे बनविणाऱ्यांना चाप बसणार असल्याचा दावा केल जात आहे. या सर्व पत्रांवर क्युआर कोड टाकण्यात आला असून त्यामुळे कागदपत्रांची सत्यता तपासणे शक्य झाले आहे.

या सोडतीतील ५५० विजेत्यांनी सदनिकेच्या संपूर्ण विक्री किंमतीचा भरणा केला आहे. मात्र दीडशे विजेत्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष ताबा देण्यात आला आहे. उर्वरित विजेत्यांनी सदनिकेची संपूर्ण विक्री किमत भरलेली असली तरी अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, कलाकार प्रमाणपत्र सादर न केल्याने सदनिकेचा ताबा देण्याची प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली आहे. सोडतीतील विजेत्यांना वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज घेण्यासाठी तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मंडळातर्फे आजतागायत सुमारे १४११ ना-हरकत प्रमाणपत्र २४ तासांच्या आत ऑनलाइन वितरित करण्यात आले आहे.